तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:07 IST2024-11-19T13:06:52+5:302024-11-19T13:07:16+5:30
मतदान केल्यानंतर त्यांना दुपारी १२ वाजण्याच्या आत सोलापूर सोडावे लागणार आहे.

तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
Vidhan Sabha Voting ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी सोलापुरातून तडीपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहरात चार तासांची परवानगी देण्यात आली आहे. मतदान केल्यानंतर त्यांना दुपारी १२ वाजण्याच्या आत सोलापूर सोडावे लागणार आहे. शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत फौजदार चावडी पोलिस ठाणे, जेलरोड पोलिस ठाणे, सदर बझार पोलिस ठाणे, विजापूर नाका पोलिस ठाणे, सलगरवस्ती पोलिस ठाणे, जोडभावी पेठ पोलिस ठाणे व एमआयडीसी पोलिस ठाणे, असे सात पोलिस ठाणे आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तडीपारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. शिवाय या पूर्वीही कारवाया करण्यात आल्याने तडीपार झालेले मतदार हे पुणे, अहमदनगर, गुलबर्गा, सातार, विजापूर आदी ठिकाणी पाठवण्यात आले आहे. शहरात येण्यासाठी त्यांना दोन वर्षे बंदी आहे. असे असले, तरी त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी चार तासांची परवानगी देण्यात आली.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने तडीपारची कारवाई सातत्याने सुरू आहे. गेल्या वर्षभरात ५० ते ५२ गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे. लोकशाही उत्सवामुळे तडीपार असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
दरम्यान, "मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तडीपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहरात परवानगी दिली आहे. मात्र, दिलेल्या वेळेतच त्यांनी मतदान केले पाहिजे. संबंधितांना नियम व अटी घालूनच शहरात हजर राहण्याची परवानगी दिली आहे. अन्यथा संबंधितांवर पुन्हा एकदा कारवाई केली जाईल," अशी माहिती पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे.