अपहार प्रकरणी अभियंत्यावर गुन्हा
By admin | Published: May 23, 2014 12:55 AM2014-05-23T00:55:46+5:302014-05-23T00:55:46+5:30
रस्त्याचे काम : ७२ लाखांचा अपहार
सोलापूर : २००९ ते २०११ या काळात अक्कलकोट, मोहोळ आणि दक्षिण सोलापूरसह इतर ठिकाणी कागदोपत्री रस्त्याचे काम केल्याचे दाखवून ७१ लाख ९७ हजार २३७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये कार्यकारी अभियंत्यांसह नऊ जणांविरुद्ध सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे़ कार्यकारी अभियंता आऱ एस़ बोबडे, उपअभियंता मुकर अंबादास उर्फ एम़ एस़ सूळ, उपअभियंता ए़सीक़दम, उपअभियंता व्ही़ वाय़ कोंडगुळे, अभियंता ए़जी़ आराध्ये, अभियंता बी़ जे़ दहिवडे, अभियंता डी़ एस़ पवार, शाखा अभियंता एस़ बी़ बशेट्टी, शाखा अभियंता एफ़ बी़ मुल्ला अशी अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अधिकार्यांची नावे आहे़आरटीआय कार्यकर्ता सूर्यप्रकाश भीमाशंकर कोरे (वय ४५, रा़ शिंगडगाव, ता़ दक्षिण सोलापूर) यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून हा प्रकार उघडकीस आणला़ १७ सप्टेंबर २००९ ते ३१ मार्च २०११ या काळात वरील अधिकारी येथील जिल्हा परिषदेत कार्यरत असताना जिल्ह्यात अक्कलकोट (म्हैसलगी, पानमंगरुळ, कुमठे), दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर अशा चार तालुक्यांमध्ये २० रस्त्यांची कामे काढण्यात आली़ प्रत्यक्षात रस्त्याची ही कामे न करता केवळ कागदोपत्री दाखवून ७१,९७,२३७ रुपयांचा अपहार केला़ माहितीच्या अधिकाराखाली कोरे यांनी पाठपुरावा केला आणि वेगळीच माहिती हाती आली़ त्यानंतर त्यांनी येथील न्यायालयात हे प्रकरण दाखल केले़ न्यायालयाने हे प्रकरण तपासून कार्यकारी अभियंत्यांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले़ याप्रकरणाचा तपास फौजदार कोळेकर करीत आहेत़