देवीला दाखविला असाही एक नैवेद्य...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:55 PM2019-09-30T12:55:49+5:302019-09-30T12:56:14+5:30
आजच्या ‘दुनियादारी’ तील कोर्ट स्टोरी सुमारे ४० वर्षांपूर्वीची. दरवर्षी नवरात्रौत्सवात हा खटला आठवतोच. घटनाही तशीच. ‘ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन ...
आजच्या ‘दुनियादारी’ तील कोर्ट स्टोरी सुमारे ४० वर्षांपूर्वीची. दरवर्षी नवरात्रौत्सवात हा खटला आठवतोच. घटनाही तशीच. ‘ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन’ याची तंतोतंत महती पटवून देणारी. नुकतेच मिसरुड फुटलेल्या पाच तरण्याबांड मुलांना खुनाच्या खटल्यात अटक झाली होती. लग्नाच्या आदल्या दिवशी देवीच्या देवळात नैवेद्य दाखवण्यास आलेल्या गावच्या धनदांडग्या पोलीस पाटलाच्या मुलाचा शिरच्छेद केल्याच्या आरोपावरुन त्या पाच तरुणांवर खटला भरण्यात आला होता. त्या पाचही आरोपींना खटल्याबद्दल विचारले असता, ते एकच वाक्य म्हणायचे, आबासाहेब, आम्ही काहीही पाप केलं नाही आणि ते गप्प बसायचे.
यथावकाश खटल्याची सुनावणी सुरु झाली. खटला फक्त एका नेत्र साक्षीदाराच्या पुराव्यावर अवलंबून होता. हा नेत्र साक्षीदार परगावचा राहणारा होता. मारेकरी त्याच्या पूर्वपरिचयाचे नव्हते. अशा प्रकरणात संशयितांची ओळख परेड घेणे कायद्यानुसार अत्यंत महत्त्वाचे असते, परंतु या खटल्यात ओळख परेड घेण्यात आली नव्हती. जर ओळख परेड घेतली नसेल तर अशा साक्षीदाराच्या कोर्टातील पुराव्यावर विश्वास ठेवता येत नाही. ओळख परेड घेतली नसल्यामुळे नेत्र साक्षीदाराच्या कोर्टातील साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, हा आमचा युक्तिवाद मान्य होऊन पाचही जणांची निर्दोष मुक्तता झाली. निकालाच्या दिवशी मी परगावी गेल्याने आरोपींची भेट झाली नव्हती. त्यामुळे खरे काय घडले हे आरोपींना विचारु शकलो नाही.
सुमारे दोन महिन्यानंतर सदरचा खटला माझ्याकडे चालविण्यासाठी देणारे त्यातील एका आरोपीचे मामा मला भेटण्यास आले. मी त्यांना खरे काय आहे हे विचारले. त्यांनी सांगितलेली माहिती फारच धक्कादायक होती.
गर्भश्रीमंत असलेल्या पोलीस पाटलाचा पैलवान पोरगा मस्तवाल होता. तरण्याताठ्या गोरगरीब मुलींकडे बघताना त्याच्या शरीरातील मस्ती डोळ्यात उतरायची. त्याच्या नजरेत आलेल्या पोरींच्या अब्रूवर घाला पडू लागला. गावात कुजबुज सुरू झाली. सगळी गरीब जनता, कोणीही जाब विचारु शकत नव्हते. नुकतेच मिसरुड फुटलेले गावातील हे पाच तरुण, पोलीस पाटलाच्या पोराच्या गैरकृत्यामुळे पेटून उठले होते. देवीभक्त असलेले हे सर्व पाच जण रोज संध्याकाळी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या देवीच्या देवळात दर्शनासाठी जात असत. आपण काहीतरी केले पाहिजे. गावात गोरगरीब आया-बहिणींची अब्रू लुटणाºया या राक्षसाला धडा शिकवायलाच पाहिजे. गोरगरीब पोरींची अब्रू वाचवायला पाहिजे, अशी त्यांच्यात तळमळीने चर्चा व्हायची. पोराच्या करामती पोलीस पाटलाच्याही कानावर गेल्या होत्या.
‘लग्न केल्यावर पोरगं सुधारतो’ या चुकीच्या समजुतीतून पोलीस पाटलाने त्याचे लग्न करायचे ठरविले. तोलामोलाचे स्थळ बघून लग्न ठरविले. लग्नाचा मुहूर्त ठरला. लग्नाचे वºहाड गावातून निघताना नवरदेवाने देवीच्या देवळात जाऊन देवीला नैवेद्य दाखवायची त्या गावात प्रथा होती. पोलीस पाटलाचं नवरदेव पोरगं नैवेद्य दाखवायला आल्यानंतर त्याची ‘गेम’ करायचा त्या पाच तरुणांनी डाव रचला. देवळात नैवेद्य दाखवताना पाटलाच्या पोराच्या मानेवर कुºहाड मारुन त्याच्या मुंडक्याचाच नैवेद्य देवीला दाखवायचा असा पक्का मनसुबा त्यांनी रचला होता. डाव ठरल्याप्रमाणे हे सर्व पाच जण देवीच्या देवळात दबा धरुन बसले. प्रथेप्रमाणे वºहाड निघण्याच्यावेळी नवरदेव आपल्या एका परगावच्या नातेवाईकांबरोबर देवीला नैवेद्य दाखवण्यास आला. देवीच्या अंधाºया गाभाºयात त्याचा मृत्यूच दबा धरुन बसलेला होता. त्याने देवीसमोर नैवेद्य दाखवताच गाभाºयात असलेल्याने कुºहाड उचलली. मंदिर छोटेसेच असल्याने कुºहाड भिंतीला लागली आणि आवाज झाला. घाबरुन तो बाहेर पळत सुटला. दबा धरुन बसलेल्या बाकीच्यांनी त्यास पकडले आणि खाली पाडले. त्याच्या मानेवर वार करुन त्याचा शिरच्छेद केला. नैवेद्य दाखवण्यासाठी सोबत आलेला तो नातेवाईक पार घाबरुन पळत सुटला. गावात येऊन त्याने मंदिरात घडलेला सर्व थरारक प्रकार सांगितला. पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आली. तपासादरम्यान या पाच जणांना अटक होऊन त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला.
मामा पुढे सांगू लागला, मी पोरांना म्हणालो, बाबांनो असे काही करु नये आणि केले तर थोडे डोके तरी वापरावयाचे, तो पोलीस पाटलाचा पोरगा व्यसनी होता. लग्नानंतर कधीतरी रात्री-अपरात्री तुम्हाला गेम करता आला असता ना.. तर ते पाच जण मामाला म्हणाले, तसे केले असते तर लग्नानंतर त्याची बायको विधवा झाली असती ना! त्या पाप्याला मारण्याचे पाप आम्हाला लागणार नाही पण त्याच्या बायकोला विधवा केले असते तर त्याचे पाप आम्हाला निश्चितच लागले असते!
नवरात्रौत्सवात रोज देवीची आरती करताना आपण म्हणतो- दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ं जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी.. देवीने स्वत: महिषासुर राक्षसाचा जसा वध केला तसा त्या पाच भक्तांकडूनदेखील राक्षसाचा वध करुन घेतला नसेल ना? वाचक हो, तुमचे काय मत आहे? देवीला त्या वासनांध राक्षसाचा वध करुन नैवेद्य दाखवणारे ते पाचजण पापी आहेत की निष्पाप?
-अॅड. धनंजय माने
(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)