पांडुरंगास २५ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण; बंगळुरुच्या भाविकांची २० वर्षांपासून वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 02:30 AM2018-11-24T02:30:43+5:302018-11-24T02:31:02+5:30
पंढरीच्या पांडुरंगाला शुक्रवारी बंगळुरुच्या एका भाविकाने २५ लाख रुपयांचा सोन्याचा हार अर्पण केला. बंगळुरु येथील उद्योजक एन. जी. राघवेंद्र व बिपीन बी. जलानी यांनी विठ्ठलाला ६३३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे.
पंढरपूर (जि़ सोलापूर) : पंढरीच्या पांडुरंगाला शुक्रवारी बंगळुरुच्या एका भाविकाने २५ लाख रुपयांचा सोन्याचा हार अर्पण केला.
बंगळुरु येथील उद्योजक एन. जी. राघवेंद्र व बिपीन बी. जलानी यांनी विठ्ठलाला ६३३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे. या हाराची किंमत २५ लाख रुपये असून जीएसटी कर वेगळा भरावा लागणार आहे. राघवेंद्र यांनी यापूर्वी विठ्ठलाला शालीमार व मोत्याचा हार देखील अर्पण केला होता. राघवेंद्र व त्यांच्या पत्नी उषा हे विठ्ठलभक्त असून, ते गेल्या २० वर्षांपासून पंढरीची विठ्ठलाची वारी करतात.
राघवेंद्र यांनी विठ्ठलाला दान दिलेला हार गुरुवारी विठ्ठलाच्या गळ्यात घातला होता. एऩ जी़ राघवेंद्र यांच्या स्वप्नामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी आले होते. त्यामुळे त्यांनी चंद्रहार दिल्याचे राघवेंद्र यांची कन्या स्मिता बडवे यांनी सांगितले.
गोरगरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठुरायाला भाविकांकडून लाखो रुपयांचे अलंकार भेट मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अलीकडच्या काळात विठूरायाला मिळालेली ही सर्वात मोठी भेट आहे.