पीपीई किट घालून अधिकारी, कर्मचारी करणार मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:50 AM2021-05-02T01:50:37+5:302021-05-02T01:50:46+5:30
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक; आज मतमोजणी
सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार असून सर्व मतमोजणी कर्मचारी पीपीई किट घालूनच मतमोजणी करणार आहेत. शिवाय त्यांना सॅनिटायझर, मास्क, फेसशिल्ड दिले जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. महाआघाडीकडून स्व. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान अवताडे हे उमेदवार आहेत. २ लाख ३४ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. या मतमोजणी केंद्रात सुरक्षिततेच्या व कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, सहायक निवडणूक अधिकारी सुशील बेल्हेकर, स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मतमोजणी टेबल, आरोग्य कक्ष, पीपीई किट कक्ष, प्रसार माध्यम कक्ष यांची पाहणी करून आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.