मतपेट्या घेऊन अधिकारी पोहोचू लागले गावोगावच्या मतदान केंद्रावर!
By Appasaheb.patil | Published: May 6, 2024 03:22 PM2024-05-06T15:22:57+5:302024-05-06T15:23:27+5:30
Lok Sabha Election 2024 : मतदानासाठी मतपेट्या घेऊन मतदान अधिकारी गावोगावी पोहोचू लागले असून शहरातील अनेक मतदान केंद्रावर उद्याच्या मतदानासाठीची लगभग दिसून येत आहे.
सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा निवडणूकीसाठी उद्या मंगळवार ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. हे मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. मतदानासाठी मतपेट्या घेऊन मतदान अधिकारी गावोगावी पोहोचू लागले असून शहरातील अनेक मतदान केंद्रावर उद्याच्या मतदानासाठीची लगभग दिसून येत आहे.
दरम्यान, आज सकाळपासूनच नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर व नूतन मराठी विद्यालयातून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतपेट्या वाटप करण्याचे काम सुरू आहे. मतपेट्या गावोगावी पोहोच करण्यासाठी एसटी बसेस, खासगी शाळांच्या बसेस व जीपची मदत घेण्यात आली आहे.
प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदान अधिकारी यांच्या हातात मतपेट्या, बॅलेट युनिट व आवश्यक ते साहित्य देण्यात आले असून पेालिस बंदोबस्तात हे साहित्य मतदान केंद्रावर पोहोचू लागले आहे. शहरातील काही मतदान केंद्रावर साहित्य पोहोचले असून ग्रामीण भागातील गावागावात साहित्य पोहोचू लागले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ व माढा मतदारसंघांमध्ये एकूण ३६ लाख ५६ हजार ८३३ मतदार आहेत. यामध्ये १८ लाख ९० हजार ५७२ पुरुष व १७ लाख १४ हजार ९७६ महिला आहेत आणि २८५ तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण ३६१७ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत.