पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची शासकीय पूजा होणार!
By बाळकृष्ण दोड्डी | Published: May 25, 2024 07:50 PM2024-05-25T19:50:23+5:302024-05-25T19:51:45+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक झाली.
सोलापूर : सहा ते एकवीस जुलै दरम्यान पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची आषाढी यात्रा होणार असून १७ जुलै रोजी पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार आहे. यंदा दहा ते बारा लाख भाविक येण्याची शक्यता असून १५ जून पूर्वी पालखी मुक्काम ठिकाणी पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर मोनिका सिंह ठाकुर, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके, माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले आदी उपस्थित होते.