काश्मिरातली देखणी माणसं सोलापुरात उचलतात ओझं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:59 PM2019-06-05T13:59:03+5:302019-06-05T14:03:32+5:30

बिहारीबाबू, बंगालीदादा निभावताहेत माथाडीची भूमिका; ट्रान्स्पोर्ट अन् डाळ कारखान्यात रोजगार 

Often, people from Kashmiri people are picking up in Solapur | काश्मिरातली देखणी माणसं सोलापुरात उचलतात ओझं

काश्मिरातली देखणी माणसं सोलापुरात उचलतात ओझं

Next
ठळक मुद्देबिहारीबाबू कामगार कम हमालीचे काम करताना पक्के सोलापूरकर होऊन गेलेतमुकादमाच्या माध्यमातून एक टोळी गेली की दुसरी टोळी त्यांची जागा घेतेसोलापुरात काय आहे? यापेक्षा इथे काय नाही, या प्रश्नाचे उत्तर हेच परप्रांतातील कामगार देऊ शकतात

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : भारतातील काश्मीर म्हणजं जणू भूतलावरील स्वर्गच... साडेसहा किंवा त्यापेक्षाही अधिक फूट उंच असलेली तिथली देखणी माणसं ट्रान्स्पोर्टमध्ये ओझं उचलताना अगदी निष्ठेने माथाडी कामगाराची भूमिका निभावत असतात. इथल्या बहुतांश डाळ कारखान्यातही बंगालीदादा, बिहारीबाबू कामगार कम हमालीचे काम करताना पक्के सोलापूरकर होऊन गेलेत. मुकादमाच्या माध्यमातून एक टोळी गेली की दुसरी टोळी त्यांची जागा घेते. 

सोलापुरात काय आहे? यापेक्षा इथे काय नाही, या प्रश्नाचे उत्तर हेच परप्रांतातील कामगार देऊ शकतात. एकीकडे सोलापुरात रोजगार नाही म्हणून इथली मंडळी इतरत्र स्थलांतर करीत असताना मात्र दुसरीकडे रोजगारासाठी जम्मू-काश्मीर, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल येथील अनेक बेरोजगार युवक रोजगारासाठी सोलापुरात दाखल होत असतात. सोलापूरची चादर आणि टॉवेल्स सातासमुद्रापार गेली आहे. अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमध्ये अनेक यंत्रमाग कारखाने आहेत. या कारखान्यातील टॉवेल्स, चादरी परप्रांतात तर जातातच. शिवाय परदेशातही त्याला मोठी मागणी आहे. यामुळे ट्रान्स्पोर्ट नगरी म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या जोडभावी पेठेत अनेक मालवाहतूक करणाºया नामवंत कंपन्या आहेत. दररोज दोन-अडीचशे ट्रक भरून इथल्या चादरी आणि टॉवेल्स परप्रांतात जात असतात.

काही मालांची मुंबईमार्गे जहाजातून परदेशात निर्यात होत असते. चादरींच्या गाठी अन् टॉवेल्सचे कार्टून ट्रकमध्ये भरताना काश्मिरी माणसं थकत नाहीत. चादरींचा एक गाठ असो अथवा टॉवेल्सचे कार्टून... अगदी पाठीवर घेऊन ते फाकळ्यावरून (फळीवजा शिडी) अलगदपणे ट्रकमध्ये भरतात. काही वेळेतच ट्रक लोड करून त्याचा निरोप घेतात न् घेतात तोच ते दुसºया ट्रकमध्ये माल भरण्याच्या तयारीत असतात. ना कधी कामाची कटकट करतात ना कधी आपली गाºहाणी मांडतात. ट्रान्स्पोर्ट चालकही या मंडळींच्या कामावर जाम खूश असतात. शिफ्टवाईज काम चालत असल्याने प्रत्येकाला थोडी विश्रांती अथवा उसंत मिळते. या लोकांना राहण्याची खास व्यवस्थाही ट्रान्स्पोर्ट चालकांनी केलेली असते. घरातल्या सदस्यांप्रमाणे यांना प्रेम मिळत असल्याने ही मंडळी पूर्णत: इथल्या संस्कृतीत समरस होऊन गेली आहेत. 

डाळ कारखानदारही असतात निश्ंिचत...
- सोलापुरात अनेक डाळ कारखाने आहेत. मूग, तूर, हरभरा, मटकी, उडीद आदींवर प्रक्रिया करण्यापासून ते तयार झालेला माल ट्रक, टेम्पोमध्ये भरेपर्यंतचे सर्वच काम राजस्थान, उत्तरप्रदेश, बंगालीदादा अन् बिहारीबाबू करीत असतात. डाळ प्रक्रियेचा अभ्यासही या मंडळींना अवगत आहे. त्यांच्यावर संपूर्ण कारखाना सोपवून गेल्यावरही हे कामगार जणू विश्वासाने काम तडीस नेतात. म्हणूनच डाळ कारखानदारही निश्ंिचत असतात. बिहारीबाबू बलरामसिंग, विश्वजित सांगत होते, ‘साब, शोलापूर हमारे लिये लकी है. चार पैसे मिलते हैं और उसमें से आधा पैसा घरको भेजे देतें हैं. साल-दो साल बाद गाँव लौट जातें हैं!

काम संपल्यावर बनतात एकेक जण आचारी
- दिलेले काम वेळेत आटोपून परप्रांतीय कामगार सायंकाळी स्वयंपाकाला लागतात. दररोज जेवण बनविण्याची एकावर जबाबदारी येते. त्याला मदतीसाठी दोघे-तिघे असतात. विशेषत: भात अन् त्याबरोबर एखादी भाजी असली तर कामासाठी आलेले हे सवंगडी अंगत-पगंत करून जेवणाचा लाभ घेतात. या कामगारांच्या आरोग्याची काळजीही डाळ कारखानदार घेत असल्यामुळे दोघांमधील एक वेगळे नाते दिसून येते. 

Web Title: Often, people from Kashmiri people are picking up in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.