अरे माणसा माणसा ! कवा होणार माणूस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 04:29 PM2019-08-05T16:29:20+5:302019-08-05T16:29:25+5:30
माणूस विमानाच्या सहाय्याने पक्ष्याप्रमाणे आकाशात संचार करायला शिकला, जहाजाच्या सहाय्याने पाण्यात माशाप्रमाणे फिरु लागला, अवकाश यानाने चंद्रावर गेला, अंतराळात ...
माणूस विमानाच्या सहाय्याने पक्ष्याप्रमाणे आकाशात संचार करायला शिकला, जहाजाच्या सहाय्याने पाण्यात माशाप्रमाणे फिरु लागला, अवकाश यानाने चंद्रावर गेला, अंतराळात फिरु लागला, पण अजून जमिनीवर माणसाप्रमाणे त्याला वागता येत नाही म्हणून तर नसेल ना, खान्देशातील प्रसिध्द आदरणीय कवयित्री बहिणाबार्इंनी प्रश्न विचारला ‘अरे माणसा माणसा! कवा होणार माणूस?’ त्याचीच प्रचिती आणून देणारी आजची कोर्ट स्टोरी.
जेलमधून पत्र आले. पत्रातील मजकुरावरुन समजून आले की, त्या बार्इंना लहान जन्मलेल्या मुलीच्या खुनाच्या आरोपावरुन अटक झालेली आहे, त्यांचे कोणीही नातेवाईक त्या बार्इंना अटक झाल्यापासून भेटायला आलेले नव्हते. मी त्यांचे वकीलपत्र घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. माझ्या सहकारी वकिलांना त्या बार्इंची जेलमधून वकीलपत्रावर सही आणण्यास व केसची कागदपत्रे घेऊन येण्यास पाठविले. वकीलपत्रावर सही व कागदपत्रे मिळाली. तिसरी मुलगीच झाल्यामुळे तिचा नवरा व सासरचे लोक तिला प्रचंड त्रास देत होते. नवरा तर तिला नेहमी बेदम मारहाण करीत असे. त्या छळाला कंटाळून तिने काही दिवसांपूर्वीच जन्माला आलेल्या मुलीला कवटाळून विहिरीत उडी घेतली होती. शेजारच्या शेतात काम करणारा शेतकरी ताबडतोब विहिरीवर पळत गेला. त्याने विहिरीत उडी मारुन तिला वाचविले. परंतु ते बाळ बुडाले होते. तिच्यावर त्या बाळाचा खून केला व तिने स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन तिच्याविरुध्द खटला दाखल झाला होता. तिच्यातर्फे आम्ही जामीन अर्ज दाखल केला. आरोपी महिला असल्यामुळे न्यायाधीशांनी तिचा जामीन अर्ज मंजूर केला. तिच्या नवºयाला जामीन घेऊन येण्याबद्दल पत्र लिहिले. नवरा भेटायलादेखील आला नाही. तिला वडील नव्हते.
विधवा आई मजुरी करुन बेघर वस्तीत राहून कसेबसे जीवन जगत होती. तिलादेखील पत्र पाठविले. ती आली. तिने जामीनदार मिळविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तिला जामीनदार मिळाला नाही. तिच्या नवºयाच्या गावचा एकजण आला होता. त्याला तिच्या नवºयाला जामीन देण्यासाठी बोलावून आणण्यासाठी सांगितले. तो म्हणाला, तिचा नवरा हरामखोर आहे. बायको जेलमध्येच राहावी व तिला जन्मठेप होऊन कायमची ती जेलमध्येच राहावी अशी त्याची इच्छा आहे. त्याने दुसरे लग्न करायची तयारी सुरुदेखील केली आहे, असेदेखील त्याने सांगितले. त्या दुर्दैवी स्त्रीची केस तर फारच विचित्र होती. शिक्षा होण्याची दाट शक्यता होती. खटल्याच्या दिवशी तिला जेलमधून आणण्यात आले. तिला मी स्पष्टपणे सर्व गोष्टीची कल्पना दिली. ती ढसाढसा रडत म्हणाली, वकीलसाहेब त्या दिवशी मी मेले असते तर किती बरे झाले असते हो. मला फार गलबलून आले.
यथावकाश केसची सुनावणी सुरु झाली. मला तर सर्व अंधकारच जाणवत होता. सोलापुरातील ख्यातनाम डॉ. विजय कानेटकर यांची गाठ घेतली. त्यांना केसची सर्व कल्पना दिली. शवविच्छेदन अहवाल दाखविला. शवविच्छेदन अहवाल त्यांनी बारकाईने वाचला. त्यातील त्रुटी सांगितल्या. त्यांच्या मार्गदर्शनानुसार शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांचा उलट तपास करुन सदर बालकाचा मृत्यू बुडाल्यामुळे झाला हा त्या डॉक्टरांचा निष्कर्ष किती चुकीचा आहे हे त्या डॉक्टर साक्षीदाराकडून कबूल करुन घेतले. त्या बालकाचा मृत्यू बुडून झाल्यामुळे, ‘झाला’ याबद्दलचा पुरावा संशयास्पद आहे, तहान लागल्यामुळे विहिरीत पाणी किती आहे हे वाकून बघताना तोल जाऊन ती स्त्री आरोपी विहिरीत पडली असा आमचा बचाव होता. न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली. निकालाच्या दिवशी तिचा नवरा अगर आई कोणीही आले नव्हते. एस.टी.बसचे तिकीट व इतर खर्चाला पैसे देऊन तिला तिच्या आईकडे पाठविले.
दिवसामागून दिवस जात होते. एकेदिवशी एक मनुष्य केसची कागदपत्रे घेऊन आॅफिसला आला. मुलगी झाल्यामुळे केलेल्या छळामुळे त्याच्या सुनेने आत्महत्या केलेली होती. त्याबद्दल त्याच्या मुलावर खटला भरण्यात आलेला होता. आरोपीचे नाव बघताच मी चमकलो.
वाचक हो तो आरोपी त्या बाईचाच नवरा होता. त्याने दुसरे लग्न केले. दुसºया बायकोलादेखील दोन मुलीच झाल्या म्हणून तो तिचा छळ करत होता. त्या छळाला कंटाळूनच त्याच्या बायकोने आत्महत्या केली होती. कवयित्री बहिणाबाई म्हणतात हेच खरे
अरे माणसा माणसा !
कवा होणार माणूस?
- अॅड. धनंजय माने
(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)