अरे बाप रे.... अनुदानच मिळाले नाही अन् लाभार्थ्यांचे अर्ज आले १६ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 10:54 AM2022-04-06T10:54:44+5:302022-04-06T10:54:50+5:30
पशुसंवर्धन विभाग; शेळी गट, दुधाळ जनावरे, कोंबडी वाटप रखडले
सोलापूर : कोंबड्यांची पिल्ले, शेळी-बोकड तसेच दुधाळ जनावरांचे अनुदान तत्त्वावर वाटप करण्यासाठी अर्ज मागविले, परंतु अनुदानच आले नाही. यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांसाठी जिल्ह्यातून तब्बल १५ हजार ७०५ इतके अर्ज आले आहेत.
ग्रामीण भागातील कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन अशा अनुदान तत्त्वावर योजना राबवते. मागील वर्षापर्यंत तालुका स्तरावर अर्ज मागवून त्यातून लाभार्थी निवडले जात होते. मागील वर्षी हेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले होते. मांसल पक्षी, शेळी-बोकड तसेच दुधाळ जनावरांचे वाटप करण्यासाठी अर्ज मागविले होते. मात्र, वर्षभरात यासाठी अनुदानच आले नाही. वर्षभराच्या शेवटी मार्च अखेरला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाला अनुदान आले असल्याचे सांगण्यात आले. या निधीतून मागील वर्षी आलेल्या ऑनलाईन अर्जातील लाभार्थ्यांची निवड यावर्षी केली जाणार आहे. दुधाळ जनावरांसाठी निधी दिला नाही, मात्र मांसल पक्षी व शेळी वाटपासाठी लाभार्थी निवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
-----------
असे आले अर्ज...
नावीन्यपूर्ण योजनेतून १० शेळी व एक बोकड गटासाठी सर्वसाधारणचे ६०४२, अपंग १६९, अनुसूचित जातीसाठी १३२३, अपंग ३६ असे ७,५२० अर्ज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाला ऑनलाईन आले. एक हजार मांसल पक्ष्यांसाठी सर्वसाधारणचे २४५३, सर्वसाधारण अपंग ७३, अनुसूचित जातीचे ५१० व अपंग १३ असे ३०४९ अर्ज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाकडे आले आहेत.
--------------
अक्कलकोट तालुक्यात लाभ...
जिल्हा परिषद पशुसंवर्धन खात्याकडून मात्र दुधाळ जनावरे, शेळी गट व कोंबड्यांची पिल्ले वाटप करण्यात आली आहेत. दोन दुधाळ जनावरांचे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यात ५ तर इतर प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यात १५ लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप झाले. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना १० शेळी व एक बोकड याप्रमाणे अक्कलकोट तालुक्यात दोन व इतर प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १२ लाभार्थ्यांना वाटप केले.
----------
अनुसूचित जातीच्या जिल्ह्यातील ११८ व्यक्तींना दोन दुधाळ जनावरांसाठी अनुदान देण्यात आले. माळशिरस तालुक्यात २०, पंढरपूर १५, सांगोला, अक्कलकोट, माढा व मोहोळ तालुक्यात प्रत्येकी ११, बार्शी व दक्षिण तालुक्यात प्रत्येकी ९, करमाळा, मंगळवेढा प्रत्येकी ८ तर उत्तर तालुक्यात ५ लोकांना दुधाळ जनावरांचे वाटप झाले. सर्वसाधारण व्यक्तींसाठी कोंबड्यांच्या १०० पिलांचे वाटप ४६२ लाभार्थ्यांना झाले.
---------
असे आहे अनुदान...
दुधाळ दोन जनावरांची किंमत ८५ हजार ६१ रुपये इतकी ठरवली आहे. यापैकी ६३ हजार ७९६ रुपये अनुदान तर २१,२६५ रुपये लाभार्थी हिस्सा आहे. १० शेळ्या व एक बोकडाची किंमत एक लाख ३ हजार ५४५ रुपये. त्यातील ७७,६५९ रुपये अनुदान व २५,८८६ रुपये लाभार्थ्यांनी भरायचे आहेत. कोंबडी १०० पिलांसाठीच्या १६ हजार रुपयांपैकी ८ हजार रुपये लाभार्थी हिस्सा तर ८ हजार रुपये अनुदान दिले जाते. अनुसूचित जमातीसाठी आदिवासी विभाग, अनुसूचित जातीसाठी सामाजिक न्याय तर सर्वसाधारणसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळाला.
---------
शेतकरी कुटुंबासाठी दुधाळ जनावरे, शेळी गट, कोंबडी पिल्ली वाटप या योजना लोकप्रिय व गरजेच्या होत आहेत. आलेल्या अर्जांतून गरजूंना लाभ मिळण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाचा प्रयत्न असतो.
- डाॅ. नवनाथ नरळे, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन अधिकारी, सोलापूर