अरे बाप रे; बायको म्हणे फेकतेय अंगावर मोबाईल; वारंवार देते आत्महत्येची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 03:34 PM2021-07-23T15:34:09+5:302021-07-23T15:34:20+5:30
हिला समस्या तक्रार निवारण केंद्राकडे पतीराजांच्या तब्बल १७२ तक्रारी
सोलापूर : पत्नीकडून वारंवार आत्महत्येची धमकी देणे, शिवीगाळ करणे, प्रसंगी मारहाण करणे अशा विविध कारणांवरून छळ केल्या प्रकरणी कोरोनाच्या काळात महिला तक्रार निवारण केंद्राकडे पतीराजांकडून १७२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये संसारामध्ये सासू-सासऱ्यांचा वाढता हस्तक्षेप, वारंवार घेतला जाणारा संशय अशा कारणांचाही समावेश आहे.
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च २०२० रोजी केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी जारी केली होती. संचारबंदीमुळे पती बहुतांशी वेळ घरात राहत होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये पती-पत्नीमध्ये वाद होत होता. किरकोळ कारणावरून पत्नी पतीला वेठीस धरायच्या. काहीकेल्या पत्नी ऐकत नसल्याने अनेक पतींनी तिच्याविरुद्ध शहर पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार समस्या निवारण केंद्रात धाव घेतली.
पत्नी माझ्यावर संशय घेऊन स्वतःबरोबर मुलांना घेऊन आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. तिच्या आई-वडिलांचे ऐकून घरामध्ये सतत भांडण काढते. माझ्या आई-वडिलांनाही शिवीगाळ करून मला वेगळे राहण्याचा आग्रह करीत आहे. मला माझ्या पत्नीकडूनच धोका आहे, अशा एक ना अनेक तक्रारी पतीदेवाने केल्याचे दिसून येत आहे.
मानसिक छळ नव्हे, तर मारहाणही करते
- - एका पतीने पत्नीला तू माहेरच्या लोकांना फोनवर इतका वेळ का बोलत असते, अशी विचारणा केली होती. त्यावर चिडलेल्या पत्नीने पतीला मोबाइल फेकून मारला. त्यानंतर मारण्यासाठी अंगावर धावून गेली होती.
- - कोरोनात सारखे घरात राहिल्यामुळे पत्नीच्या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष जात होते. चुकलेल्या गोष्टीसंबंधी विचारणा केली असता एका पत्नीने पतीला चपलेने मारल्याचाही प्रकार समोर आला आहे.
- - सासू-सासरे यांच्यासोबत वाद होताना मध्यस्थी करणाऱ्या पतीला सासरच्या लोकांकडून मारहाण झाली असल्याची तक्रारही प्राप्त झाली आहे.
कोरोना काळात वाढल्या तक्रारी
- कोरोनापूर्वी पती कामानिमित्त बाहेर असल्याने तक्रारी होत नव्हत्या. मात्र संचारबंदीमुळे घरात एकत्र राहिल्याने किरकोळ कारणावरून सतत वाद होण्याचे प्रकार वाढले आहेत. नातेवाइकांनी अनेकवेळा सांगूनही पत्नी ऐकत नव्हती. त्यामुळे कोरोनाच्या काळात पत्नीविरुद्ध तक्रारी करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
आर्थिक टंचाई अन् सतत घरात
- - कोरोना काळामध्ये अनेक पतींच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याच जणांच्या पगारामध्येही कपात झाली. आर्थिक टंचाई निर्माण झाल्यामुळे नेहमीप्रमाणे गरजा भागत नव्हत्या. घरात हे नाही ते नाही, असे म्हणत पत्नी वारंवार पतीसोबत भांडण करीत असल्याच्या तक्रारींचाही यात समावेश आहे.
- - बऱ्याच जणांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात आले होते. कामाच्या वेळा कमी झाल्या होत्या, त्यामुळे घरातील सहवास वाढला. यामुळे एकमेकांच्या चुका काढून भांडणे झाल्याच्याही तक्रारी आल्या आहेत.
पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?
- पत्नीला साधी शिवीगाळ केली तरी पोलिसात लगेच तक्रार घेतली जाते. गुन्हा नोंदला जातो. मात्र पत्नी विरुद्ध तक्रार करण्यास गेल्यानंतर पोलीस दखल घेत नाहीत. महिलांच्या प्रत्येक समस्येसाठी कायदा आहे, मात्र आमच्यावर कितीही अन्याय झाला तरी तो निमूटपणे सहन करावा लागतो. आम्ही न्याय मागायला गेलो तर प्रथमत: आमच्याकडेच संशयाच्या नजरेने पाहिले जाते. आमच्या बाजूने कोण लढणार?
बायकोकडून छळ होत असल्याच्या तक्रारी
- २०१८ - १०१
- २०१९ - १४०
- २०२० - १२०
- २०२१ - ५२