अरे वा ! उजनीत उतरलं अग्निपंख; शेकडोंच्या थव्यांचे पर्यटकांना आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 09:42 AM2021-11-19T09:42:40+5:302021-11-19T09:42:51+5:30
परदेशी पाहुण्यांचं स्वागत :जनी परिसरात येणाऱ्या पर्यटक व पक्षी निरीक्षकांची पावले वळतील
करमाळा : उजनी जलाशयाच्या विस्तीर्ण पाणीसाठ्यातील उथळ पाण्याच्या (दलदलीच्या) ठिकाणी देश-विदेशातील सर्वांचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचे आगमन नुकतेच पळसदेव (ता. इंदापूर) शिंदे वस्ती तसेच खातगाव (ता. करमाळा) भागात शेकडोंच्या संख्येने झाले आहे. या थव्यांचं पर्यटकांना आकर्षण ठरलं आहे.
उजनी जलाशयात विविध जातींचे पक्षी अन्नपाण्याच्या शोधात दरवर्षी येत असतात. त्याप्रमाणे यावर्षीही येऊ लागले आहेत. हिवाळ्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये पक्ष्यांचे आगमन होत असते. मात्र सध्या उजनीतील पाणीसाठा जसजसा कमी होईल, तसतसे पक्ष्यांना पाणथळ जागा उपलब्ध होतात आणि विणीच्या हंगामासाठी हजारोंच्या संख्येने पक्षी उजनी जलाशय परिसरात दाखल होतात. विदेशातील हजारो किलोमीटरचा पल्ला पार करून फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन उजनी जलाशयात झाले आहेत. त्याची लाल चोच, लांबसडक मान, गुलाबी पंख असे लोभस रूप असल्यामुळे या पक्ष्याला अग्निपंख या नावानेही ओळखले जाते.
पाणकोंबडी, नाना तऱ्हेचे बदक व बगळे, काळा शराटी, करकोचा, सीगल अशा देश-विदेशातील विविध पक्ष्यांनी उजनीचा काठ हळूहळू गजबजू लागला आहे. गेली दोन वर्ष कोरोनाने देशभरातील नागरिक भीतीने व कामाअभावी ताणतणावामुळे पूर्णतः कोलमडले होते. आता परिस्थिती सुरळीत झाली असल्याने मनावरचे भीतीचे सावट कमी झाले आहे. यामुळे पक्षिप्रेमी व पर्यटकांना उजनीतील फ्लेमिंगो पक्ष्यांसह विविध पक्ष्यांना पाहण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता कमी झाल्याने व कोविड टाळेबंदीला शिथिलता मिळाल्याने उजनी परिसरात येणाऱ्या पर्यटक व पक्षी निरीक्षकांची पावले वळतील, अशा प्रतिक्रिया जाणकारांकडून व्यक्त होत आहेत.
फ्लेमिंगोचे लवकर आगमन
हिवाळ्याच्या प्रारंभीच्या काळात मत्सघार, समुद्र पक्षी, पाणलावा हे पक्षी येऊन धडकतात. हिवाळ्याच्या मध्यावधीत चक्रांग व परी या बदकांसह पात्राला व पाणटिलवा हे जलपक्षी आगमन करतात, तर त्यांच्या आगमनानंतर रोहित अर्थात फ्लेमिंगो येऊन दाखल होत असतात. फ्लेमिंगो यावर्षी जरा लवकरच येऊन विहार करण्यात मग्न आहेत, ही बाब पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली आहे.
-----
गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व कोविडच्या प्रादुर्भावामुळे परिसर व पर्यावरणात विलक्षण व प्रतिकूल परिणाम निर्माण झाल्यामुळे धरण परिसरातील मोठे आकर्षण ठरणारे नजाकतदार रोहित पक्ष्यांबरोबर इतर काही स्थलांतरित बदकांनी पाठ फिरवली होती. मात्र यावर्षी निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणामुळे नित्याने जलाशयाकडे वारी करणारे विदेशी पक्षी ठरलेल्या वेळापत्रकानुसार येतील, असा अंदाज आहे.
- डॉ.अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक
----