अहो आश्चर्यम्; इथे नवरी नव्हे तर नवरदेवच निघाला अल्पवयीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 03:29 PM2020-10-02T15:29:06+5:302020-10-02T15:31:18+5:30
बालविवाह रोखला; बार्शी तालुक्यातील घटना
बार्शी : तरुण-तरुणीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले़ आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही, असे म्हणताच दोन्ही कुटुंबांनी प्रसांगावधान राखले अन् त्यांच्या विवाहास सहमती दिली़लग्नाची तारीख, वेळ ठरली़ पण दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडण्यापूर्वीच पोलीस दाखल झाले़ त्यांनी मुलाचे वय २१ नसल्याने कायद्यानुसार हा विवाह होऊ शकत नसल्याचे सांगून हा विवाह रोखला.
आजवर अल्पवयीन मुलीचे होणारे बालविवाह प्रशासनाकडून रोखले गेले परंतु बार्शी तालुक्यात मुलगी सज्ञान आहे अन् मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण नसल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून हा विवाह रोखला.
हा प्रेमविवाह २९ सप्टेंबर रोजी दुपारी घरासमोर करण्याचे ठरले होते़ त्याप्रमाणे मोजकेच नातेवाईक त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जमले. मोजकीच मंडळी असलीतरी एकच धांदल उडालेली.
विवाहाचा क्षण जवळ आला, तितक्यात पोलीस दारात दिसले अन् सर्वांनाच धक्का बसला़ नंतर चौकशी सुरू झाली़ घडले असे, तालुक्यातील एका गावात २१ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलाचा विवाह होत असल्याची माहिती तहसील प्रशासनास समजली. लागलीच त्यांनी शहर पोलीसांना कळविले़ त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी त्वरित दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा ठाकूर, हवालदार लक्ष्मण भांगे, श्रीमंत खराडे, रविकुमार लगदिवे, मलंग मुलाणी, महिला पोलीस स्वाती डोईफोडे यांचे पथक विवाहस्थळी दाखल झाले़ .
विवाहाच्या जय्यत तयारीत असलेल्या वधू-वरांसह पाहुणे, नातेवाईकांना त्यांनी थेट पोलीस ठाण्यात आणले. कायद्यानुसार हा विवाह करता येत नसल्याचे सांगितले आणि समज दिली़
दोघांचे वय समान, पण कायद्याचा अडसर
मुलगा आणि मुलगी या दोघांच्या वयाची तपासणी पोलिसांनी केली. तेव्हा दोघांचेही वय १९ असल्याचे निष्पन्न झाले़ मुलाचे वय कायद्यानुसार २१ वर्षे असणे गरजेचे आहे तर वधूचे १८ वर्षे़ मुलाचे वय कायद्यानुसार दोन वर्षे कमी असल्यामुळे पोलिसांनी अखेर हा प्रेमविवाह थांबवून सर्वांना समज दिली़