पदार्थ तळताना तेल जळतंय, इकडे शरीरातील पेशी मरतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:25 AM2021-09-24T04:25:43+5:302021-09-24T04:25:43+5:30
सोलापूर : तुम्ही खवय्या आहात, वारंवार तळलेले पदार्थ खाण्याची सवय असेल, तर ती वेळीच बदला. हॉटेल, स्नॅक्स सेंटर, चायनीज ...
सोलापूर : तुम्ही खवय्या आहात, वारंवार तळलेले पदार्थ खाण्याची सवय असेल, तर ती वेळीच बदला. हॉटेल, स्नॅक्स सेंटर, चायनीज गाड्यावर त्याच त्या तेलात अनेक पदार्थ तळले जातात. त्यामुळे तेल जळून जातं. त्या जळालेल्या तेलातील पदार्थ खाल्याने शरीरातील पेशी मरतात. त्यातून कॅन्सर सारखा आजार बळावतो. याशिवाय हार्टवर परिणाम होऊन ब्लॉकेज वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच त्या तेलात तळलेले पदार्थ खाऊ नका, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
बहुतांश हॉटेल, रेस्टॉरंट, स्नॅक्स सेंटरमध्ये खाद्य पदार्थ तळण्यासाठी एकदा तेल टाकल्यानंतर त्याच तेलात वेगवेगळे पदार्थ तळतात. वास्तविक पाहता प्रत्येक पदार्थासाठी वेगळं तेल वापरणे आवश्यक आहे. वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. हे माहीत असूनही हॉटेलमध्ये सर्रास तेलाचा पुनर्वापर होतो. लोकही काहीच विचार न करता स्वादिष्ट अन् चविष्ट लागल्यावर आवडीने खातात. त्यामुळे मानवी शरीरावर विपरीत परिमाण होतो. खाद्यतेलाच्या वारंवार वापरामुळे कॅन्सर सारखा मोठा आजारही होताे. शरीरातील पेशी मरुन जातात. शिवाय चव येण्यासाठी तेलात मीठ टाकतात. त्यामुळे बीपी, शुगर सारखे नसलेले आजार जडतात. त्यामुळे बाहेर तळलेले पदार्थ खाताना सतर्क राहणे गरजेचे आहे. हॉटेलच्या किचनमध्ये काय चाललंय हे पाहूनच बाहेरचे खाल्ले पाहिजे, अन्यथा बाहेरचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा, असे आहार तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
..............
चायनीज खाताय तर याकडे लक्ष द्याच
पार्क चौक, जुळे सोलापूर, सात रस्ता, विजापूर रोड आदी विविध भागात चायनीज सेंटर उभारले आहेत. मंच्युरियन, नूडल्स, चायनीज राईस फ्राय करुन लगेच देतात. यासाठी जळालेल्या तेलाचाच वापर होतो. तरीही आपण आवडीने खातो. त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे काळजी घ्या.
................
फ्री रॅडिकल्स पेशींना हानीकारक
कुठल्याही प्रकारच्या तेलामध्ये ट्रायग्लिसराईड्स भरपूर प्रमाणात असतात. तेल उकळताना त्याचे ऑक्सिडेशन होऊन त्यातून फ्री रॅडिकल्स तयार होतात. हेच फ्री रॅडिकल्स पेशींना हानीकारक ठरतात. बी.पी. शुगर, हृदयविकार, डीएनएमध्ये बदल होतात. जोपर्यंत तेलामधून धूर येत नाही. तोपर्यंत ते पदार्थ तळण्यासाठी योग्य समजावे.
- डॉ. स्वरुपांजली पवार, आहारतज्ज्ञ
थेट हार्टवर परिणाम
वापरलेल्या तेलात तळलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने थेट हार्टवर परिणाम होतो. त्यामुळे ब्लॉकेज वाढण्याची भीती असते. चव येण्यासाठी तेलात मीठ टाकल्यामुळे बी.पी, शुगर होण्याची शक्यता अधिक असते.
- डॉ. राहुल मेडीदर, मधुमेह तज्ज्ञ
................
तपासणीसाठी मशीन
तेलाची गुणवत्ता तपासणीसाठी मशीन आले आहे. त्या मशीनद्वारे मोठमोठ्या दुकानात जाऊन तेलाची गुणवत्ता तपासण्यात येते. त्यात २५ टक्क्यांच्या वर रिडिंग गेल्यास तेल खराब असल्याचे सिद्ध होते. आतापर्यंत झालेल्या तपासणीत खराब तेल आढळले नाही. आढळल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. १२ लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या दुकानाला १ लाख रुपये दंड करण्याची तरतूद आहे.
- प्रदीप राऊत, सहाय्यक आयुक्त, अन्न प्रशासन