पांडुरंगाच्या मंदिरात वृद्धास मुका मार; मठात महिलेस उलट्या जुलाबाचा त्रास; पंढरीतून सोलापुरात उपचारासाठी दाखल
By विलास जळकोटकर | Updated: July 17, 2024 18:30 IST2024-07-17T18:29:56+5:302024-07-17T18:30:15+5:30
गोपाल शर्मा (वय ७५, रा. नांदेड) आणि रजनी दिलीप कोहळे (वय ५५ रा. सारणी ता. तिवसा, जि. अमरावती) अशी उपचार घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.

पांडुरंगाच्या मंदिरात वृद्धास मुका मार; मठात महिलेस उलट्या जुलाबाचा त्रास; पंढरीतून सोलापुरात उपचारासाठी दाखल
सोलापूर : पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या ७५ वर्षीय वारकरीबुवांना मंदिरातून परतताना पायाला मुका मार लागला तर अन्य एका महिलेला मठात उलट्या-जुलाब होऊन अशक्तपणा आल्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बुधवारी हलवण्यात आले. गोपाल शर्मा (वय ७५, रा. नांदेड) आणि रजनी दिलीप कोहळे (वय ५५ रा. सारणी ता. तिवसा, जि. अमरावती) अशी उपचार घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.
लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दोघेही आपापल्या गावातून पंढरपूरला आले होते. यातील वारकरी बुवा गोपाळ शर्मा हे दुपारच्यावेळी मंदिरातील पांडुरंगाचे दर्शन घेऊन बाहेर पडताना पायाला ठेच लागल्याने मुका मार लागला. त्रास होऊ लागल्याने ते पंढरपूरच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार घेऊन सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दुसरी घटना पंढरपुरातील दिलीप महाराज मठात रजनी दिलीप कोहळे या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी थांबल्या होत्या. उलट्या जुलाबाचा त्रास होऊ अशक्तपणा आल्याने त्यांना पंढरपुरात प्राथमिक उपचार करुन दिनेश कडू या नातलगांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरु आहेत.