शाळकरी मुलांच्या सायकली चोरणाऱ्या आजोबांना अटक; CCTV मुळे झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 15:45 IST2025-03-23T15:45:22+5:302025-03-23T15:45:43+5:30

शाळा, ट्यूशन व घरासमोर लावलेल्या सायकली तो चोरत होता. सायकली चोरून तो कमी किमतीमध्ये विकत असे.

old man arrested for stealing school childrens bicycles CCTV footage | शाळकरी मुलांच्या सायकली चोरणाऱ्या आजोबांना अटक; CCTV मुळे झाला भांडाफोड

शाळकरी मुलांच्या सायकली चोरणाऱ्या आजोबांना अटक; CCTV मुळे झाला भांडाफोड

Solapur Crime : शाळकरी मुलांच्या सायकली चोरणाऱ्या ७२ वर्षाच्या वृद्धाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून विजापूर नाका पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे, फौजदार चावडी पोलिस ठाणे, जोडभावी पेठ पोलिस ठाणे व जेल रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेल्या १४ सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. शहरातून सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते, त्या अनुषंगाने तपास करीत असताना एका ठिकाणी सायकल चोरून नेतानाचे फुटेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून कॅमेऱ्यातील इसमाचा शोध घेतला. तेव्हा बाबूलाल शामलाल कुकरेजा याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी तपास केला असता, त्याने १४ सायकली चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १२ दखलपात्र तर दोन अदखलपात्र असे १४ गुन्हे उघडकीस आले. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, उमेश पवार, चालक बाळासाहेब काळे यांनी पार पाडली.
 
खाणे, पिणे अन् फिरणे इतकेच काम
बाबूलाल कुकरेजा हा सराईत गुन्हेगार असून तो शहरातून फिरत असतो. त्याच्यावर १९८० पासून चोऱ्या, घरफोड्यांसारखे गुन्हे दाखल आहेत. सध्या वय झाल्याने तो फक्त सायकली चोरतो, त्यातून जेवणाचा, दारूचा खर्च भागवतो. त्याला स्वतः चे घर नाही, तो असाच फिरत असतो, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

सायकल चोरून करायचा विक्री
बाबूलाल कुकरेजा हा एकटा असून, तो फिरस्ती आहे, लक्ष ठेवून तो सायकली चोरत होता. शाळा, ट्यूशन व घरासमोर लावलेल्या सायकली तो चोरत होता. सायकली चोरून तो कमी किमतीमध्ये विकत होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो सायकल चोरताना आढळून आला होता. त्यानुसार तपास करून बाबूलाल कुकरेजा याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी दिली.

Web Title: old man arrested for stealing school childrens bicycles CCTV footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.