अवजड वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा बळी
By विलास जळकोटकर | Published: July 21, 2024 06:19 PM2024-07-21T18:19:51+5:302024-07-21T18:20:09+5:30
ट्रकनं उडवलं : अक्कलकोट रोडवर अपघात
सोलापूर : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहनानमुळे अपघात वाढत आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास अक्कलकोट रोडवर कमला को ऑप. बँकेच्या कॉर्नरवर पायी चालत निघालेल्या वृद्धाला केमिकलच्या टँकरने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रमेश कोटय्या श्रीमल (वय ६५, रा. जुना विडी घरकूल, सोलापूर) असे मयत वृद्धाचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात बीएनएस १०६ (१) अन्वये मृत्यूस कारणीभूत गुन्हा नोंदला आहे. आतिक इब्राहिम शेख (वय ४६, रा . संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या चालकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार एम. एच. १३ सी यू ५५७७ क्रमांकाची केमिकल वाहतूक करणारे अवजड वाहन (मालट्रक) रविवारी सकाळी आठच्या सुमारास अक्कलकोट रोडवरुन अक्कलकोटकडे निघाले होते. या दरम्यान कमला को ऑप बँकेच्या कॉर्नरजवळून वरील मयत वृद्ध पायी चालत निघाला होता. चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने पादचाऱ्यास जोराची धडक बसली. पादचारी रोडवर कोसळल्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला.
या अपघाताची खबर मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मयताची सून बालमनी श्रीमल यांनी तातडीने वृद्धाला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन सदर वृद्धाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.