बांधावरील तारेच्या कुंपणातून विजेचा प्रवाह उतरून वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:54 AM2021-01-13T04:54:52+5:302021-01-13T04:54:52+5:30
बार्शी : रात्री वराहांपासून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून बांधावर घातलेल्या तारेच्या कुंपणातून विजेचा प्रवाह उतरून त्याचा धक्का ...
बार्शी : रात्री वराहांपासून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून बांधावर घातलेल्या तारेच्या कुंपणातून विजेचा प्रवाह उतरून त्याचा धक्का बसून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
शंकर पंढरीनाथ पारवे (वय ६०, रा. कोरेगाव, ता. बार्शी) असे मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी दुपारी बार्शी तालुक्यात कोरेगाव येथे ही घटना घडली. याबाबत त्यांचा मुलगा मनोज शंकर पारवे (३७, रा. उपळाई रोड, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी देवीदास गिराम व त्याचा मुलगा आण्णा देवीदास गिराम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडील मिळालेल्या माहितीनुसार पारवे यांच्याशेजारी देवीदास गिराम यांची शेती आहे. शेतातील पिकांचे रात्री वराहांकडून नुकसान होत असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी गिराम यांनी बांधावर तारेचे कुंपण घातले आहे. या तारेतून त्यांनी विजेचा प्रवाह सोडला होता. मात्र, दिवसा तो बंद केलेला नव्हता. शेजारील शंकर पारवे आणि त्यांचे पुतणे हे शनिवारी दुपारी ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले. यावेळी तारेच्या कुंपणातून विजेचा प्रवाह खाली उतरला आणि विजेचा धक्का बसून ते खाली पडले. ते जोरजोरात ओरडू लागले. त्यांच्या आवाजाने निशिकांत चोरमले व बाळासाहेब पारवे धावत आले आणि विजेचा प्रवाह खंडित केला. बेशुद्धावस्थेत त्यांना बार्शीतील रुग्णालयात दाखल केले असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अधिक तपास हवालदार राजेंद्र मंगरुळे करीत आहेत.