भीमा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By Appasaheb.patil | Published: August 12, 2022 05:23 PM2022-08-12T17:23:15+5:302022-08-12T17:24:53+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : दिवसेंदिवस पंढरपुरातील भीमा नदीत पाणी वाढत आहे, त्यामुळे शुक्रवारी दुपारी दगडी पुल पाण्याखाली गेला. उजनीतून पाणी साेडल्याने भीमा नदीच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उजनी व वीर धरणातून पाण्याचा भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. भीमा नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने नीरा व भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहनही प्रांताधिकारी यांनी केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना संभाव्य पुरामुळे कोणताही धोका पोहचणार नाही तसेच जीवित व वित्तहानी होणार नाही यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत योग्य नियोजन करावे. तसेच महापुरामुळे नदीकाठावरील गावांमधील ज्या लोकांची घरे पुरामुळे बाधित होण्याची शक्यता अशा कुटूबांचे तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. संबंधित गावातील शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, धर्मशाळा आदी सुरक्षित ठिकाणी थांबण्याची व्यवस्था करण्यात यावी. नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहून नदी तीरावरील त्यांची जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलवावी. जेणेकरून कुठलीही जिवीत व वित्त हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही गुरव यांनी केल्या.
तालुक्यातील पुलांची व संरक्षण कठड्यांची पाहणी बांधकाम विभागाने करावी. पावसाळ्यात साथीचे रोग अधिक उध्दभवण्याची शक्यता असते, यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय सेवा व औषध पुरवठा सुरळीत ठेवावा. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने तसेच संबधित ग्रामपंचायतीने नागरिकांना शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा होईल याबाबबत दक्षता घ्यावी. सर्व शासकीय अधिकरी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबावे. पूरस्थिती ओसरल्यानंतर साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होऊ नये तसेच साथरोगाचा फैलाव होऊ नये. यासाठी ग्रामपंचायत व नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता करुन तत्काळ धूर आणि किटकनाशक औषध फवारणी करावी, अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी दिल्या. तसेच अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. अफवा पसरवणाऱ्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापनातंर्गत कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.