पोथरे येथे सीना नदीत पडलेल्या ओमचा मृतदेह पोटेगावात सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:18+5:302021-09-16T04:28:18+5:30
ललिता अनिल शेळके या वेळू (ता.श्रीगोंदा, जि.नगर) येथील रहिवासी असून त्या माहेरी आल्या होत्या. त्यांच्यासोबत ओम नावाचा दहा ...
ललिता अनिल शेळके या वेळू (ता.श्रीगोंदा, जि.नगर) येथील रहिवासी असून त्या माहेरी आल्या होत्या. त्यांच्यासोबत ओम नावाचा दहा वर्षांचा मुलगाही होता. सध्या सीना नदीला पाणी असल्याने ते जनावरांना पाणी पाजायला मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता गेले. ओमने एक वासरू हाताला तिढा बांधून धरले होते. पाणी पिताना वासरू पाण्यात घसरून पडले. त्याबरोबर हाताला दाव्याचा तिढा असल्याने ओमही पाण्यात पडला. वासरू पोहून पलीकडच्या कडेला निघाले. पण ओम पाण्याच्या डोहात बुडाला. त्याची आई ललिता यांनीही पाण्यात उडी मारून, त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. त्यानंतर तिने नातेवाईकांना बोलावले. त्यानंतर शोधमोहीम सुरू होती, मंगळवार रात्री सात वाजेपर्यंत यश आले नव्हते. बुधवारी सकाळी पावणेआठ वाजता त्याचा मृतदेह सापडला.
.....
पोटेगावात डोके तरंगताना दिसले
पोटेगाव येथे आबा झिंजाडे हे नदीकाठी गेले असताना, त्यांना डोके तरंगताना दिसले. त्यांनी तत्काळ इतरांना आवाज दिला. त्यानंतर अनिल झिंजाडे, चंद्रकांत झिंजाडे, आबा झिंजाडे सचिन शिंदे, शांतीलाल झिंजाडे, सागर झिंजाडे, रवींद्र जाधव हे तिथे गेले व त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला. ओम शेळकेचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. ओमचा मृतदेह पाहताच आई ललिता व सर्व झिंजाडे परिवारात एकच आक्रोश सुरू झाला. या घटनेने पोथरे गावावर शोककळा पसरली आहे.
(फोटो १४ओम शेळके)