कमला एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पदस्पर्श दर्शनरांग गेली गोपाळपूरपर्यंत
By काशिनाथ वाघमारे | Published: July 29, 2023 07:06 PM2023-07-29T19:06:27+5:302023-07-29T19:09:32+5:30
दर्शनासाठी लागतात तब्बल पाच तास..
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : आषाढी यात्रा सोहळ्यानंतर आलेल्या अधिक श्रावण महिन्यातील कमला एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दोन ते अडीच लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली तर चंद्रभागा नदीपात्रामध्ये पवित्र स्नानासाठीही भाविकांनी गर्दी केली. पदस्पर्श दर्शन रांग पत्राशेड ओलांडून रिद्धी-सिद्धी मंदिर, गोपाळपूरपर्यंत गेली.
आज चंद्रभागा नदीत स्नान, विठ्ठल मंदिर कळसाचे दर्शन, प्रदक्षिणा घालून भाविकांनी कमला एकादशीचा सोहळा साजरा केला. प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग व मंदिर परिसर विठुनामाच्या जयघोषाने निनादून गेला. मुखदर्शन रांगेतही भाविकांची गर्दी दिसून आली. प्रमुख संतांच्या दिंड्यांनीही चंद्रभागा वाळवंटात गर्दी केली होती. तसेच रेल्वे, एसटी, खासगी वाहनाने येणा-या भाविकांची संख्याही मोठी होती.
दर्शनासाठी लागतात तब्बल पाच तास..
कमला एकादशीच्या पूर्वसंध्येला दर्शन रांगेत जवळपास लाखाहून अधिक भाविक होते. मात्र, एकादशीच्या दिवशी या गर्दीमध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे पदस्पर्श दर्शनासाठी तब्बल पाच ते सहा तास लागले. त्यामुळे शनिवारी सकाळच्या सत्रात मुखदर्शनाच्या रांगेतही प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. तरीही जवळपास एक ते दीड लाख भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला.