ढाबा अन् हॉटेलवर दारू पिणाऱ्यानी एक्साईजच्या टीमला पाहताच काढला पळ

By Appasaheb.patil | Published: December 13, 2022 01:11 PM2022-12-13T13:11:37+5:302022-12-13T13:11:59+5:30

नऊ मद्यपींसह दोन हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हे दाखल; न्यायालयाने ठोठावला ६८ हजारांचा दंड

On seeing the excise officials, the drinkers ran away from the hotel and dhaba | ढाबा अन् हॉटेलवर दारू पिणाऱ्यानी एक्साईजच्या टीमला पाहताच काढला पळ

ढाबा अन् हॉटेलवर दारू पिणाऱ्यानी एक्साईजच्या टीमला पाहताच काढला पळ

Next

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरातील अक्कलकोट रोड व बार्शी रोडवरील धाब्यांवर अचानक छापा टाकून धाबा चालकांसह त्या ठिकाणी दारू पिताना आढळून आलेल्या नऊ मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या पथकाने सोलापूर-बार्शी रोडवरील भोगाव गावाच्या हद्दीतील हाॅटेल गावरान तडका या ठिकाणी छापा टाकून मालक बलभीम शिवाजी तांबे (रा. अंबिकानगर, बाळे) यांच्यासह मद्यपी ग्राहक सोमनाथ बसवराज चौगुले, अनिल तायाप्पा तांबे, नागनाथ रामलिंग कल्याणकर, परमेश्वर चंद्रकांत माने व परमेश्वर हरिश्चंद्र शेळके यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अक्कलकोट रोड शांती चौक येथील हाॅटेल दीपक या धाब्यावर छापा टाकून चंद्रकांत रामण्णा साळुंखे (रा. रविवार पेठ) या हाॅटेल मालकासह त्या ठिकाणी दारू पित बसलेले संगमेश्वर राठीमाणी, प्रकाश चव्हाण, चिदानंद बिराजदार व रमेश चव्हाण यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, सुनील कदम, दुय्यम निरीक्षक अंकुश आवताडे, सुनील पाटील, उषाकिरण मिसाळ, गणेश उंडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान प्रियंका कुटे, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, इस्माईल गोडीकट, प्रकाश सावंत व वाहनचालक रशीद शेख व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.

एका दिवसात आरोपपत्र दाखल...
सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (अ) (ब) व ८४ नुसार गुन्हा दाखल करून गुन्ह्याचे तपास अधिकारी यांनी १२ डिसेंबला एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले असता दारूबंदी न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी नम्रता बिरादार, यांनी तत्काळ निकाल देत दोन्ही ढाबाचालकांना प्रत्येकी २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार असा एकूण ६८ हजारांचा दंड ठोठावला आहे.

Web Title: On seeing the excise officials, the drinkers ran away from the hotel and dhaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.