आंबे विषबाधा प्रकरणातील एकाचा मृत्यू १५९ जणांना बाधा;

By admin | Published: May 8, 2014 08:53 PM2014-05-08T20:53:49+5:302014-05-09T00:10:24+5:30

६३ रुग्णांना सोलापूरला हलविले

One among the mango poisoning cases hamper 159 people; | आंबे विषबाधा प्रकरणातील एकाचा मृत्यू १५९ जणांना बाधा;

आंबे विषबाधा प्रकरणातील एकाचा मृत्यू १५९ जणांना बाधा;

Next


पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथील दर्लिंग देवाच्या प्रसादातून विषबाधा झालेल्या दीपक कृष्णा शिंदे (वय २३) याचा गुरूवारी पहाटे सोलापुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील ८९ रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यापैकी ६३ रुग्णांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आंबे (ता. पंढरपूर) येथील राजाराम विठ्ठल पुजारी यांच्या घरी दर्लिंग देवाच्या वालगानिमित्त सोमवारी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यात ३५० नागरिकांनी भोजन घेतले. यातील ३५ जणांना मंगळवारी विषबाधा झाल्याने स्थानिक रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. बुधवारी अचानक ११५ लोकांना पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवार आणि बुधवारी १५९ जणांवर उपचार सुरू होते. यातील ४० रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. दरम्यान दीपक शिंदे याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला सोलापुरातील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बुधवारी संध्याकाळी प्रकृतीत सुधारणा झाल्याने घरी पाठविण्यात आलेल्या रूग्णांपैकी १० जणांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने गुरुवारी सकाळी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणखी ३० जणांनाही मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पुणे आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. कदम यांनी रुग्णालयाला भेट देऊन पुरेसा औषधसाठा, मनुष्यबळ आदींची पाहणी केली.
-----------------------------------------
अन्न नमुन्यांची तपासणी
बुधवारी अन्नसुरक्षा विभागाचे आर. एम. भरकड, एफ. टी. तोरम, पी. ए. यादव यांनी आंबे येथे जाऊन राजाराम पुजारी यांच्या घरी कार्यक्रमादिवशी जेवणातील लाडू, चपाती, तांदूळ, खाद्यतेल, पिण्याचे पाणी आदींचे नमुने तपासणीसाठी घेऊन पुणे येथील राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा येथे तपासणीसाठी पाठवले आहे.
-------------------------------------------
दुसर्‍यासाठी गेला जीव
स्वत:ला विषबाधेचा त्रास होत असतानाही दीपक कृष्णा शिंदे याने सर्व रुग्णांना रुग्णालयात पोहचवण्याचे काम केले. या सर्व प्रक्रियेत अधिक वेळ गेल्याने त्याला विषबाधेचा त्रास वाढला. त्याला जादा त्रास होत असल्याचे पाहून अनिल शिंदे यालाही त्रास सुरु झाला. दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दीपकचा मृत्यू झाला. अविवाहित दीपक हा पंढरपूर येथील शिक्षक सोसायटीमध्ये सेवक म्हणून नोकरीस होता. त्याला लग्नासाठी मुली बघण्याचे काम सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर आघात झाला. त्याच्या प›ात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी, चुलते असा परिवार आहे.
-------------------------------------------
विषबाधेने दोन दिवस उपाशीपोटी असलेल्या रूग्णांच्या शरीरातील पांढर्‍या पेशी कमी होऊ लागल्या आहेत. पांढर्‍या पेशी वाढविण्याची यंत्रणा पंढरपुरात उपलब्ध नसल्याने रूग्णांना सोलापूरला हलविणे गरजेचे होते. त्यामुळे पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले.
- डॉ. पंकज गायकवाड
वैद्यकीय अधीक्षक

Web Title: One among the mango poisoning cases hamper 159 people;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.