बीआयएसच्या मानांकनाविनाच चालतात दीडशे पशुखाद्य प्रकल्प!
By दिपक दुपारगुडे | Updated: July 23, 2023 17:55 IST2023-07-23T17:54:56+5:302023-07-23T17:55:15+5:30
दुधात एसएनएफ वाढण्यासाठी गुणवत्तेच्या पशुखाद्य निर्मितीसाठी राज्य शासनाने बीआयएस मानांकन सक्तीचे केल्याने हा मुद्दा पुढे आला आहे.

बीआयएसच्या मानांकनाविनाच चालतात दीडशे पशुखाद्य प्रकल्प!
सोलापूर : राज्याच्या पशुसंवर्धन खात्याला आतापर्यंत पशुखाद्य, पेंड उत्पादन करणाऱ्या १७१ प्रकल्पांचा शोध लागला असून त्यातील अवघ्या २९ पशुखाद्य प्रकल्पांना भारतीय मानक संस्थेचे (बीआयएस, ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड) चे मानांकन आहे. दुधात एसएनएफ वाढण्यासाठी गुणवत्तेच्या पशुखाद्य निर्मितीसाठी राज्य शासनाने बीआयएस मानांकन सक्तीचे केल्याने हा मुद्दा पुढे आला आहे.
राज्याबाहेरील काही दूध संघ व राज्यातीलही काही मोजके संघ फॅट ३.५ व एसएनएफ ८.५ असलेलेच दूध स्वीकारतात. हे दूध संघ स्वतः निर्मित पशुखाद्य दूध उत्पादकांना पुरवितात व गुणवत्तेचे दूध संकलन करून घेतात. हे दूध संघ फॅट व एसएनएफशी तडजोड करीत नाहीत. हेच दूध विशेष करून लहान बाळ तसेच सर्वांच्याच आरोग्यासाठी पोषक असल्याचे मत आहे.
राज्यात सर्व प्रकारचे पशुखाद्य निर्माण करणारे १७१ प्रकल्प पशुसंवर्धन खात्याच्या पाहणीत आढळले आहेत. या ही पेक्षा अधिक पशुखाद्य प्रकल्प असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या १७१ पैकी अवघ्या २९ पशुखाद्य प्रकल्पांना भारतीय मानक संस्थेचे (बीआयएस) चे मानांकन असल्याचे सांगण्यात आले. भेसळ व कमी प्रतीचे दूध बाजारात विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गुणवत्तेचे दूध उत्पादित होण्यासाठी जनावरांना सकस पशुखाद्य मिळणे गरजेचे असल्याचा मुद्दा मंत्र्यांनी नेमलेल्या समितीसमोर आला. त्यानुसार शासनाने पशुखाद्य प्रकल्पांना बीआयएस मानांकन घेण्याचा आदेश काढला.
मानांकनासाठी महिन्याची मुदत..
राज्यातील पशुखाद्य तयार करणाऱ्या सर्वच प्रकल्पांसाठी बीआयएसचे मानांकन असणे बंधनकारक केले आहे. असे मानांकन घेतल्यानंतर तयार पशुखाद्याची पशुसंवर्धन खात्याकडून शासनमान्य प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे बंधनकारक केले आहे.