प्रगल्भ, क्रिएटिव्ह अन् अधिक कल्पनाशक्ती असलेले सोलापुरातील दीडशे डावखुरे एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 03:39 PM2020-08-13T15:39:13+5:302020-08-13T15:41:44+5:30
जागतिक डावखुरा दिन : मोदी, ओबामा, बिल गेट्स, अमिताभ बच्चनही लेफ्टी
रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : डावखुरे अर्थातच डाव्या हाताचे... ही मंडळी प्रगल्भ, क्रिएटिव्ह असतात. त्यांची कल्पनाशक्ती उजव्यांपेक्षा अधिक सरस असते. सोलापुरात स्थापन करण्यात आलेल्या संघटनेत दीडशे डावखुरे एकवटले आहेत. डावखुºयांविषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी व्याख्यानं घेतली गेल्याचे सोलापूर लेफ्ट हॅन्ड असोसिएशनचे अध्यक्ष आणि निवृत्त प्राध्यापक डॉ. शिरीष आहेरकर यांनी जागतिक डावखुरा दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ला सांगितले.
सर्वच क्षेत्रांमध्ये डावखुºयांनी आपला एक ठसा उमटवला आहे. अहिंसावादी महात्मा गांधी हे डावखुरे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा, बिग बी अमिताभ बच्चन, रतन टाटा हेही डावखुरे असल्याचा आम्हा डावखुºया मंडळींना अभिमान असल्याचेही प्रा. आहेरकर यांनी सांगितले. मातेच्या गर्भात अर्भकाची वाढ होत असताना त्याच्या कुठल्या मेंदूचा विकास होतो त्यावर जन्मणारे बाळ हे उजवे की डावखुरे याचा अंदाज बांधता येतो. जर उजव्या मेंदूचा विकास अधिक होत असेल तर समाजावे की जन्मणारे ते बाळ डावखुरे (लेफ्टी) असते.
जेव्हा बाळाचा जन्म होतो आणि पुढे जसजशी त्याची वाढ होते तेव्हा बाळाने जो हात अधिक पुढे करेल त्यावर ते बाळ उजवे की डावखुरे ओळखायला वेळ लागत नाही. त्याच्यासमोर एखादी वस्तू पुढे केली की, ती घ्यायला डावा हात पुढे येत असेल तर माता-पित्यांनाही चिंता लागून राहते. डावखुरे मुले जन्माला येण्याला कारणीभूत म्हणजे अनुवंशिकपणा, असे डॉक्टर सांगतात.
डावखुरी मुले ओळखण्याची प्रमुख दोन लक्षणे आहेत. दोन्ही हातांनी टाळी वाजवताना त्यांचा डावा अंगठा उजव्या अंगठ्यावर येणे आणि एखादी वस्तू घेण्यासाठी डावा हात पुढे जाणे ही प्रमुख लक्षणे मानली जातात.
डावखुºयांविषयीचे गैरसमज व्याख्यानातून दूर
सोलापुरात लेफ्ट हॅन्ड असोसिएशनची स्थापना करण्यात आली. शहरातील दीडशे जणांनी या संघटनेचे सदस्यत्व घेतले. समाजात डावखुºयांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुण्यातील एका अभ्यासकाचे व्याख्यान आयोजित करून असोसिएशनने प्रयत्न केले. जागतिक डावखुºया दिनानिमित्त यावर विशेष भर दिला जातो, असे डॉ. शिरीष आहेरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
क्रीडा क्षेत्रातही डाव्यांचे वर्चस्व..
क्रीडा क्षेत्रातही डावखुºया खेळाडूंनी एकापेक्षा एक सरस विक्रम केले आहेत. क्रिकेटमध्ये आजवरचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सर गारफिल्ड सोबर्स डावखुरा होता. हा योगायोग नाही. तो मैदानावर काहीही करू शकायचा. फलंदाजी, जलद गोलंदाजी, फिरकी... फक्त स्वत:च्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करू शकत नव्हता. पण सगळं डाव्या हातानेच. सुलतान आॅफ स्विंग वसीम अक्रमही डावखुरा होता. लारा, गांगुली आणि अनेक नामांकित खेळाडू डावखुरे होते. अगदी सचिन तेंडुलकरही डावखुरा आहे. एकूणच खेळात डावखुºया मंडळींचे मोठे वर्चस्व राहिले आहे.
डावखुºयांसाठी वस्तूंचीही निर्मिती
उजवे असणारे कुठलीही वस्तू सहजपणे हाताळतात. मात्र डावखुºयांसाठी ती अडचणीची ठरते. डावखुºयांसाठी इस्त्री, कात्री, आॅर्गन (बुलबुल), गिटार आता बाजारात उपलब्ध आहेत. अन्य काही वस्तू डावखुºयांसाठी याव्यात, अशी अपेक्षा डावखुºया मंडळींनी व्यक्त केली आहे.