सांगोल्यात बागेतून चोरले दीड लाखांचे डाळिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:19+5:302021-03-05T04:22:19+5:30
सांगोला : विक्रीसाठी तयार असलेले दीड लाख रुपयांचे डाळिंब अज्ञात चोरट्याने पळविले. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदला ...
सांगोला : विक्रीसाठी तयार असलेले दीड लाख रुपयांचे डाळिंब अज्ञात चोरट्याने पळविले. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदला आहे. शेतकरी प्रल्हाद केदार यांनी चोरीस गेलेले डाळिंब आटपाडी, सांगोला, मंगळवेढा या ठिकाणी कोणी विक्रीस आणली आहेत का ? याचा शोध घेतला मात्र चोरटा सापडला नाही. शेवटी त्यांनी बुधवार ३ मार्च रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
केदार यांनी त्यांच्या दोन एकर क्षेत्रापैकी पाऊण एकरात भगव्या जातीची ४०० झाडांवर डाळिंबाची लागवड केली आहे. त्याचा चालू बहार ऑगस्ट २०२० मध्ये धरला होता. सध्या बागेतील डाळिंब विक्रीसाठी तयार झाली होती. दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी ते दिवसभर बागेत काम करून सायंकाळी ७ वाजता घराकडे परतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्यांच्यासह घरातील सर्वजण बागेत गेले असता झाडावरील डाळिंब गायब असल्याचे दिसून आले. चोरट्याने साधारण एक टन भगव्या जातीचे डाळिंब चोरून नेल्यामुळे केदार यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.