सौद्याअभावी दीड लाख टन बेदाणा पडून; शेतकरी संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 09:09 AM2021-05-27T09:09:12+5:302021-05-27T09:09:38+5:30
सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने बेदाणानिर्मिती केली जाते. बेदाण्यासाठी तासगावची बाजारपेठ नामांकित असल्याने तेथील गुदामात विविध जिल्ह्यांतून बेदाणा साठवला जातो.
कुर्डूवाडी (जि. सोलापूर) : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बेदाण्याचे सौदे न झाल्याने बेदाण्याची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुदामात सुमारे दीड लाख टन बेदाणा पडून असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बेदाणा आहे.
सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने बेदाणानिर्मिती केली जाते. बेदाण्यासाठी तासगावची बाजारपेठ नामांकित असल्याने तेथील गुदामात विविध जिल्ह्यांतून बेदाणा साठवला जातो. सौदे बंद असल्याने याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ऑनलाइन बेदाणा खरेदी व विक्री सौदे करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदारांतून होत आहे. सध्या सांगलीच्या गोदामात १.५० लाख टन बेदाणा पडून आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ६० हजार टन बेदाण्याचा समावेश आहे. बेदाण्याचा सरासरी विक्री दर प्रतिकिलो १८० ते २३० रुपये आहे. यापोटी अंदाजे १२०० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
लॉकडाऊनमुळे बेदाणा सौदे बंद आहेत. त्यामुळे माल पडून आहे. चालू हंगामात मशागत करण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांकडे पैसेही नाहीत. त्यामुळे ऑनलाइन सौदे सरकारने सुरू करावेत किंवा आर्थिक मदत जाहीर करावी.
- नितीन कापसे,
द्राक्ष बागायतदार, कापसेवाडी