विवाहितेच्या छळाचे दीड वर्षात १९० गुन्हे

By admin | Published: July 23, 2014 12:46 AM2014-07-23T00:46:25+5:302014-07-23T00:46:25+5:30

दुभंगलेली मने एकत्र : १७१८ अर्जांपैकी ९४१ मध्ये तडजोड

In one and a half year of marital affair, 190 crimes | विवाहितेच्या छळाचे दीड वर्षात १९० गुन्हे

विवाहितेच्या छळाचे दीड वर्षात १९० गुन्हे

Next

 सोलापूर: विवाह सोहळ्यात पती-पत्नी शेवटपर्यंत साथ देण्याची शपथ घेत असतात. काही जणांच्या बाबतीत संसारात खीळ बसते. या ना त्या कारणांमुळे पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होतात. हे मतभेद अगदी टोकाला गेल्यानंतर पोलिसांचाही नाईलाज होतो. अखेर ४९८ (अ) अन्वये गुन्हे दाखल करावे लागतात. २०१३ आणि १ जानेवारी ते ३० जून २०१४ म्हणजे दीड वर्षामध्ये पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या स्टेशन डायरीवर प्रकाश टाकला असता १९० गुन्ह्यांची नोंद झाली.
दरम्यान, दोन्ही विभागात कार्यरत असलेल्या महिला तक्रार निवारण केंद्रात दुभंगलेल्या पती-पत्नीचे मन एकत्र जोडण्याचे काम अगदी प्रामाणिकपणाने होत असते. शहर आणि ग्रामीणचा विचार करता १७१८ अर्जांपैकी ९४१ प्रकरणे तडजोडीने काढून पती-पत्नीच्या सुखी संसाराला वाट मोकळी करून दिली. पोलीस आयुक्तालयाच्या तक्रार निवारण केंद्रात गेल्या वर्षी ८५० अर्जांपैकी ४१६ जणांचे अर्ज तर चालू सहा महिन्यांमध्ये ३१३ पैकी ११३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. ग्रामीण पोलीस दलातील केंद्रात दीड वर्षामध्ये ५५५ अर्जांपैकी तडजोडीने २७८ प्रकरणे निकाली काढून एकमेकांपासून दूर गेलेल्या पती-पत्नीला एकत्र आणण्याचे काम झाले आहे.
----------------------------------------
छळामागची कारणे चारित्र्य, कन्यारत्न, व्यसनी पती
हुंडाविरोधी कायदा असताना त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. व्यसनी पतीचे घराकडे असणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे घर कसे चालणार ही चिंता ‘त्या’ पत्नीला असते. शेवटी दोघांमध्ये भांडणाला सुरुवात होते. कधी-कधी ही भांडणे इतक्या टोकाला पोहोचतात की त्यात पती पत्नीचा कधी घात करेल, याचा नेम नाही.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पतीचा पत्नीवर चारित्र्याचा संशय. कधी-कधी तसा प्रकारही नसतो. चारित्र्याच्या संशयावरून अनेक विवाहितांचे मुडदे पडले आहेत.
तिसरा प्रकार म्हणजे मुलीचा जन्म. स्त्री-भ्रूणहत्येच्या विरोधात जनजागरण मोहीम असतानाही स्त्री जन्माचे स्वागत करताना कोणी दिसत नाही. कन्यारत्न प्राप्त होणे ही एक विवाहितांच्या छळाचे प्रमुख कारण आहे. काहींचा अपवाद वगळता माहेर आणि सासरच्या मंडळींचे कधी पटतच नाही. माहेरची माणसं आली तर त्यांचे उत्साहाने स्वागत कधीच होत नाही. सासरच्या मंडळींमध्ये माहेरच्या माणसांचा हस्तक्षेपही छळाला कारण ठरू शकते. माहेरच्या मंडळींकडून सातत्याने पैशाची मागणी. ती मागणी पूर्ण झाली नाही तर विवाहितेच्या छळास कळत-नकळत प्रारंभ होतो.
--------------------------------
मुलीचा जन्म, चारित्र्याचा संशय, व्यसनी पती अन् माहेरच्या मंडळींच्या हस्तक्षेपामुळेच विवाहितांच्या छळाचे प्रमाण वाढल्याची आकडेवारी पाहता निदर्शनास येते. घरातील एक-दोघांचा छळ असताना संपूर्ण परिवारामधील सदस्यांना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागते.
-----------------------------
पतीविरुद्ध पत्नीची फिर्याद आली तर ती सहसा दाखल करून घेत नाही. महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार नोंदवल्यानंतर दोघांची मने एकत्र कशी येतील, त्यांच्या संसाराची घडी पुन्हा कशी बसेल, याचाच विचार पोलीस दल करीत असतो.
-संदीप गुरमे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा
पती-पत्नीमध्ये मतभेद येण्याचे खूप मोठे कारणही नसते. अगदी क्षुल्लक कारणावरून दोघे एकमेकांपासून लांब जातात. दोघांना एकत्र आणून त्यांच्यात सुसंवाद घडवला जातो. जर दोघे एकत्र येण्यास नकार देत असतील तरच गुन्हा दाखल करून घेतला जातो.
-नितीन कौसडीकर, पोलीस निरीक्षक- गुन्हे शाखा (ग्रामीण)
आमच्या कक्षेत दुरावलेल्या पती-पत्नींना एकत्र बोलावले जाते. त्यांच्यातील मतभेद दूर कसे होतील, यावर आमच्या विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याचा प्रयत्न असतो. जे-जे काही चांगले सांगता येईल, तेवढे सांगून दोघांना पुन्हा एकत्र कसे आणता येतील, यावरच आमचा भर असतो. जेव्हा दोघे एकत्र नांदतात, त्यातच आमचा आनंद आहे.
-चंद्रकांत काकडे, पोलीस निरीक्षक- महिला अत्याचार

Web Title: In one and a half year of marital affair, 190 crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.