दीड वर्षांत एक पॉझिटिव्ह आढळला अन्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:23+5:302021-06-09T04:27:23+5:30
दक्षिण सोलापूर : उण्यापुऱ्या ७३ उंबऱ्याचं बिरनाळ गाव. गावची लोकसंख्या अवघी ४९५. गावांत नवखा माणूस आला की, त्याची कसून ...
दक्षिण सोलापूर : उण्यापुऱ्या ७३ उंबऱ्याचं बिरनाळ गाव. गावची लोकसंख्या अवघी ४९५. गावांत नवखा माणूस आला की, त्याची कसून चौकशी करूनच त्याला प्रवेश... अशा या गावांत दीड वर्षांपासून कोरोनाला ग्रामस्थांनी वेशीवरच रोखलं होतं. तरीही एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळलाच. मग काय गावातील तरुण एकवटले, अन त्यांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्याचा निर्धार करून तिथंच थोपवण्यात यश मिळविलं.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी - बिरनाळ ही ग्रुपग्रामपंचायत. सोलापूरपासून १२ किलोमीटर अंतरावरच गाव. कोरोनाचा फैलाव सुरू झाला तेव्हापासून ग्रामस्थ कमालीचे सतर्क. पहिल्या लाटेत एकही रुग्ण आढळला नाही. त्याचं ग्रामस्थांना मोठं कौतुक होतं. सुरुवातीपासून पुरेशी काळजी घेतल्यानं कोरोनाला गावात प्रवेश मिळाला नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी माहिती दिली. कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी गावातील दोन शिक्षक सातत्याने ग्रामस्थांच्या संपर्कात होते.
दुसऱ्या लाटेतही गावानं कोरोनाला गावाबाहेरच रोखून धरलं. पण मे महिन्याच्या अखेरीस तपासणीदरम्यान एक संशयित रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. त्यांचे तातडीने विलगीकरण करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांची तपासणी केली. तीन संशयित आढळले. सर्वांना सोलापुरातील पर्यटन विकास महामंडळाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. गावातील प्रतिष्ठित मंडळी त्यांना धीर देण्यासाठी सरसावली. कोविड सेंटरमध्ये जाऊन त्यांना आधार दिला.
पॉझिटिव्ह रुग्ण निघताच गावातील इरप्पा स्वामी, ग्रामपंचायत शिपाई उमर शेख, श्रीकांत स्वामी, निंगय्या मठपती, प्रकाश हडपद आदी तरुण खडबडून जागे झाले. प्रमुख मंडळींची बैठक घेतली. कोरोनाचा शिरकाव झालाच कसा, यावर खल झाला. उपसरपंच कांतू पुजारी यांनी गावातील आशा वर्कर, उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. तरुणांनी कोरोनापासून मुक्ती मिळविण्यासाठी पुढाकार घेतला. सर्वांनी तपासणी करून घेण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले.
-------
बालकांच्या विलगीकरणाची सोय
कोरोनाच्या दोन्ही लाटेत पुरेशी काळजी घेण्यात आल्यानेच बिरनाळ गावातील परिस्थिती नियंत्रणात राहिली. ग्रामस्थ तिसऱ्या लाटेला तोंड देण्याच्या तयारीला लागले आहेत. शाळेच्या इमारतीत सोयी-सुविधा करण्याची आतापासूनच तयारी सुरू आहे. तलाठी जयश्री हुच्चे, ग्रामसेवक नागनाथ बनपुरी ग्रामस्थांचे मनोबल वाढविण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.
------
होनमुर्गी - बिरनाळ ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या एकीने कोरोनाच्या संकटाला आम्ही गावाबाहेर थोपवू शकलो. आता लसीकरणावर आमचा भर आहे. प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रित येऊन कोरोनाला हरवले.
- कांतू पुजारी, उपसरपंच, होनमुर्गी - बिरनाळ ग्रुप ग्रामपंचायत
----
गावात प्रवेश करू इच्छिणाऱ्या बाहेरील व्यक्तिंना आम्ही नेहमीच तपासणी करूनच येण्याची विनंती करतो. कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा काळजी घेण्यात अधिक शहाणपणा आहे, याची सर्वांना खात्री पटली आहे. ग्रामस्थांनी दक्षता घेतली. सूचनांचे पालन केले. म्हणूनच आमचा बचाव झाला.
- निस्सार अत्तार, पोलीसपाटील, बिरनाळ