तडीपार असतानाही सांगोला तालुक्यात प्रवेश केल्याने एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:29+5:302021-04-15T04:21:29+5:30
सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील वारंवार गुन्हे करणाऱ्या ८ जणांना सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. ...
सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील वारंवार गुन्हे करणाऱ्या ८ जणांना सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. त्यापैकीच एक तुषार इंगळे यास १९ मार्च रोजी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार केले होते. पोलिसांनी त्यास नोटीस बजावून जिल्ह्यात प्रवेश करायचा नाही, अशी सूचना केली होती. दरम्यान, तुषार इंगळे हा मंगळवारी दु. ४ च्या सुमारास सांगोला-वासुद रोड येथील कुटुंब सुपर मार्केट येथे आल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी अचानक छापा टाकून त्यास शिताफीने पकडले.
सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या कुमार आनंदा मेटकरी (रा. मेटकरीवस्ती सांगोला), दीपक ऊर्फ गुंडा गोरख खटकाळे (रा. वासूद), तुषार सोपान इंगळे (रा. ड्रिमसिटी, सांगोला), उमेश शिवाजी चव्हाण, सोमनाथ विलास वाघमारे (रा. महुद), राजू दिगंबर होवाळ (रा. वाकीशिवणे), सचिन आनंदा केदार (वासूद), विजय प्रकाश घोडके (रा. पाचेगाव बु !!, ता.सांगोला) यांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. यापैकी कोणीही आपल्या शहरात, गाव परिसरात कोठेही दिसून आल्यास त्यांनी तत्काळ सांगोला पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी केले आहे. ही कामगिरी पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास बनसोडे ,पोलीस कॉन्स्टेबल संभाजी भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल धुळा चोरमुले यांनी केली आहे.