एक क्लिक....परिश्रम अपार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:40 AM2019-08-19T10:40:55+5:302019-08-19T10:44:01+5:30
जागतिक छायाचित्रण दिवस; सोलापुरातील हौशी छायाचित्रकारांच्या मेहनतीवर एक नजर
यशवंत सादूल
खरं तर छायाचित्रण म्हणजे एक कला..पण एखादी कला साध्य झाल्यानंतर कलाकृती साकारण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. चित्रकार निसर्ग किंवा व्यक्तीचित्रण लीलया करू शकतो. मूर्तीकाराला तर दगडामध्येच मूर्ती दिसत असते. त्यातून तो सुंदर मूर्ती घडवतो. संगीतकार सप्तसुराच्या माध्यमातून सुंदर धून तयार करतो; पण छायाचित्रणाचं तसं नसतं. एखादी व्यक्ती, घटना, पक्षांचा विहार किंवा निसर्गाचं छायाचित्रण करण्यासाठी छायाचित्रकाराला समोरच्या घटकावर अवलंबून राहावं लागतं. यासाठी त्याचे तासन्तास खर्ची होतात. अतिशय दक्ष राहून कॅमेरा नजरेसमोर ठेवून ते स्वत:ला अन् इतरांना आनंद देणारं एक ‘क्लिक’ करावं लागतं...सोलापुरातील हौशी छायाचित्रकारांना ते आनंददायी ‘क्लिक’ करायला नेमकी कशी अन् किती मेहनत घ्यावी लागली... त्याची कहाणी जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने....
सूर्योदयाची प्रतीक्षा करून टिपले ‘दोन सूर्य’ : यशवंत सादूल
त्तपत्र छायाचित्रकाराला सदैव तत्पर राहावे लागते. दैनंदिन घडामोडी व्यतिरिक्त निसर्गचित्रण, वन्यजीव, दीनदुबळे, वंचित, अंध, अपंग यांच्या भावना फोटोग्राफीच्या माध्यमातून मांडणारा हरहुन्नरी कलावंत यशवंत सादूल हे मागील सव्वीस वर्षांपासून लोकमतच्या सेवेत आहेत. दररोज नवनवीन आव्हानात्मक छायाचित्रण करताना ‘दोन सूर्य’ या मथळ्याखाली लोकमतच्या मुख्य अंकात छापण्यात आलेले योगगुरु बाबा रामदेव यांचे छायाचित्र. त्यावर वाचकांनी, वृत्तपत्र सृष्टीतील शुभचिंतकांनी दिलेली दाद कायमस्वरूपी आठवणीत आहे.
साळिंदराची सुटका टिपण्यासाठी परिश्रम : मिलिंद राऊळ
्नरात्रभर पाण्यात पडलेला साळिंदर जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होता. अंगावर काटे असणारा हा प्राणी तसा भीतीदायकच. ना त्याला हात लावता येतो, ना जवळ घेता येते. पण शहरातील प्राणी - पक्षी प्रेमींनी देगाव - केगाव रोडवरील देशमुख वस्तीजवळील संगमेश्वर स्वामी यांच्या शेतातील विहिरीत उतरून अथक परिश्रमाने साळिंदराचे प्राण वाचविले. साळिंदराला वाचविण्याची घटना टिपण्यासाठी मलाही कॅमेºयासह विहिरीत उतरावे लागले. घसरड्या दगडांवर उभे राहून हा प्रसंग टिपावा लागला. खरोखरच सारेच परिश्रमाचे होते. साळिंदराचे प्राण वाचले अन् उत्तमपणे फोटोही टिपता आले.
नेक्स्ट जनरेशन टिपण्यासाठी घेतली मेहनत : आनंद मादास
एफए इन फाईन फोटोग्राफीची पदवी संपादन करणारा आनंद मादास. शास्त्रशुद्ध छायाचित्रण करणारा सोलापुरातील एकमेव कलावंत आहे. वेडिंग फोटोग्राफीसोबत सिटी एरियल फोटोग्राफी, विविध संकल्पनेवर आधारित व्यक्तिचित्रण, निसर्ग चित्रण हे त्याचे आवडीचे विषय आहेत. नेहमी आपण पाहणारी दृश्ये वेगळ्या शैलीत मांडण्याची त्याची हातोटी आहे. सोलापुरातील मोजक्याच फोटोग्राफरची पुढची पिढी त्या व्यवसायात आहे. जुन्या पिढीतील फोटोग्राफी करत असलेले पांडुरंग इंदापुरे यांचे नातू रोहित इंदापुरे यांचे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त ‘नेक्स्ट जनरेशन’ या संकल्पनेवर आधारित हे फोटोसेशन हिप्परगा तलाव परिसरात केले आहे. फोटोग्राफी कला टिकावी पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावी या हेतूने केलेल्या या शूटसाठी वर्ष ते दीड वर्ष वाट पाहावी लागली.यातील नायक हा सध्या फोटोग्राफी करत असला तरी त्याच्या हातात वाडवडिलांनी वापरलेला पूर्वीचाच टष्ट्वीन लेन्स कॅमेरा आहे. आजोबांच्या पोषाखात फोटोग्राफी करत परंपरेचे पालन करीत असल्याचे दिसून येते.कृष्णधवल फोटोग्राफीतून जुने आणि नवीन युवा फोटोग्राफर्स यांचा संगम घडवून आणला आहे.एखाद्या कलेवर निस्सीम प्रेम करत प्रामाणिकपणे त्यामध्ये गुंतून घेतल्यास आपल्याला यश निश्चित मिळते हे मला दाखवून द्यायचे आहे.
अथक परिश्रमानंतर रेन क्वाईलने अखेर दिली पोझ : शिवाई शेळके
शिवाई शेळके या सोलापुरातील एकमेव हौशी, वन्यजीव, निसर्ग छायाचित्रकार असून त्यांनी पर्यावरण संवर्धनासोबत हा छंद जोपासला आहे.एमबीए झालेल्या शिवाई या सोलापूर परिसरात भटकंती करत मागील ५ ते ६ वर्षांपासून छायाचित्रण करत आहेत.
पावसाळी दुर्लाव म्हणजेच रेन क्वाईल... हा माळरानावरचा पक्षी असून, पावसाळ्यात याचा आवाज सर्वदूर ऐकायला येतो; पण हा पक्षी दिसणं म्हणजे दुर्मिळच. आम्ही पक्षी निरीक्षणासाठी मागच्या पावसाळ्यात गेलो होतो, तेव्हा रोज हा आवाज ऐकू यायचा. तासन्तास भटकंती करूनही अनेकदा फक्त त्याच्या आवाजावरच समाधान मानावं लागायचं. आवाज यायचा पण त्याचं दिसणं केवळ अशक्य. पण त्याला पाहण्यासाठी आम्ही सारेच आतुर होतो. त्यासाठी दररोज जात होतो. पंधरा ते सोळा दिवस त्या पक्ष्याला कॅमेºयात कैद करण्यासाठी माझी जिद्द सुरू होती. पक्षी येण्याची वाट पाहत होतो. एका रविवारी गंगेवाडी परिसरात भ्रमंतीला गेल्यानंतर अचानक त्याचा आवाज आला आणि रेन क्वाईलचे दर्शन घडले. त्याला पाहत बसायचे की फोटो काढायचे... याचा विचार न करता कॅमेºयावरील बटन क्लिक केले. त्यानेही साद देत सुंदर पोझ दिली. नुकताच पाऊस पडून गेला होता. हिरवाईने नटलेलं माळरान अन् त्यावरील दवबिंदू, त्याच्या सुंदर अदा आणि या विणीच्या हंगामात जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी त्याचं हे असं बोलावणं, आम्ही सगळेच हे दृश्य पाहत कॅमेºयात टिपू लागलो. या ‘पावसाळी दुर्लाव’च्या भेटीचे सुवर्णक्षण कॅमेºयासोबत डोळ्यात साठवून ठेवत माघारी निघालो.
चिमुकल्यांच्या क्लिकसाठी तयार केले काश्मीर : राज पवार
राज पवार हे फोटोग्राफीचा छंद जोपासतच व्यावसायिक फोटोग्राफीकडे वळले ते मोठे बंधू बालाजी पवार यांच्यामुळे. पोट्रेट, निसर्गचित्रण, बाळांचे फोटो शूट हे आवडीचे विषय आहेत. लहान मुलांचे वेगवेगळ्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रण करणे त्यांना आवडते.
लहान मुलांचे विशिष्ट संकल्पनेवर आधारित फोटोग्राफीचे अनेक प्रयोग मी केले. त्यातील एक प्रकार ‘सफरचंदाच्या बागेतील मुलगा‘ हे फोटोसेशन करताना किल्ला बागेतील झाडांनाच चक्क सफरचंद बांधले. अवघ्या वर्षभराचा तो मुलगा श्लोक त्या लालभडक,मधुर फळांकडे बघण्यात हरवून गेला.त्याने हाताने तोडून घेतले. सोलापुरात काश्मीरचा माहोल तयार करून फोटोशूट केले. फोटोग्राफीतला वेगळा प्रयोग यशस्वी केल्याचा आनंद झाला.
शोध घेत माँट्यॉगू-ससाण्याची झुंज टिपली : नागेश राव
नागेश राव हे ट्रेडिंगचा व्यवसाय करणारे गृहस्थ. घरच्या आसपास दिसणाºया पक्षी व त्यांच्या हालचालींवर निरीक्षण करता करता त्यांना वन्यजीव पक्षी निरीक्षणाचा छंद लागला. दिसलेले पक्षी, वन्यजीव चित्रांच्या रुपात संचित करून ठेवण्याच्या उद्देशाने फोटोग्राफीचा छंद लागला. सोलापूर शहर व जिल्हा परिसरात भटकंतीतून नानाविध दुर्मिळ पक्ष्यांच्या हालचाली, सवयी, शिकार, आधी बारकावे त्यांनी आपल्या कॅमेºयात कैद केले आहेत. ससाणा आणि माँट्यॉगूची झुंज... सर्वसाधारणपणे पक्ष्यांच्या प्रजातींचे स्थिरचित्रण करणे सुरुवातीला उत्सुकता वाटत असे. पण त्यांच्या हालचाली त्यांच्यातील झुंज हे फार लांबूनच पाहावयास मिळत असे. ते कॅमेºयात कैद करणे तर अशक्य होते. फार दिवस मनात असलेली ही गोष्ट अचानकपणे समोर दिसली. हिप्परगा तलावाकडून गंगेवाडीकडे जाताना तुळजापूर रस्त्यावर लाल डोक्याचा ससाणा अन् माँट्यॉगूचा भोवत्या हे पक्षी आकाशात एकमेकांशी झुंजत होते. जवळील कॅमेरा काढला नी पटापट फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली.
मूळचा सायबेरियन असलेला ‘माँट्यॉगू’च्या भोवत्या हा पक्षी स्थलांतरित होऊन भारतात येतो. तर लाल डोक्याचा ससाणा हा देशी पक्षी असून परिसरातील वर्चस्वासाठी त्यांची लढाई असते.सुदैवानं अगदी जवळून हे दृश्य पाहता आले आणि समाधान होईपर्यंत कॅमेºयात टिपता आले याचा मनस्वी आनंद होतो.
तासाच्या अॅटेंशननंतर गॉड वीट पक्षी कॅमेराबंद : सुभाष सण्णके
दक्षिण आफ्रिकेतून सात हजार किलोमीटर प्रवास अन् कुठेही थांबा न घेता सोलापुरात सहा महिने संचार करणाºया गॉड वीट पक्ष्याला कॅमेºयात कैद करण्यासाठी एक तासाचा संघर्ष करावा लागला. ना शरीराची हालचाल, ना डोळ्यांची इकडे-तिकडे नजर... एक तास उलटून जातो की काय अशी मनी शंका येत असतानाच या पक्ष्याचे दर्शन घडले अन् कॅमेºयावरील बटन क्लिक... क्लिक... करीत पाच-सहा पोझ घेतले. एक उत्कृष्ट फोटो मिळाल्याचा आनंद सोलापूर फोटोग्राफी असोसिएशनचे अध्यक्ष आणि व्यावसायिक फोटोग्राफर सुभाष सण्णके यांनी जागतिक छायाचित्र दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना आपली भावना व्यक्त केली. वेगळे फोटो काढण्याचा छंद महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जडला. १९९२ मध्ये एक छोटा कॅमेरा घेऊन वेगवेगळे फोटो काढण्यास सुरुवात केली. हिप्परगा तलाव परिसरात आॅक्टोबर ते मार्च या महिन्यात परदेशी पक्ष्यांचा वावर असतो, हे माझ्या काही मित्रांकडून समजले. त्यासाठी एक दिवस निवडला. पहाटे पावणेपाच-पाच वाजताच कॅमेरा घेऊन तेथे दाखल झालो. पक्ष्यांची नावे कळायची नाहीत. मात्र वेगळ्या पक्ष्यांचे फोटो टिपण्यासाठी एक जागा निवडली. पहाटे साडेपाच वाजता मी, कॅमेरा अन् ती निवडलेली जागा... या तीन गोष्टींतच मी रममाण झालो. दीड तासानंतर दोन पक्ष्यांचे पोझ मी चार-पाचवेळा कॅमेºयावरील बटन क्लिक करीत त्या पक्ष्यांचे लाईव्ह चित्र मी कॅमेºयात बंद केले. पक्षीमित्रांकडून माहिती घेतली असता दक्षिण आफ्रिकेतील गॉड वीट पक्षी असल्याची माहिती मला मिळाली. मी काढलेले या पक्ष्याचे फोटो जेव्हा मी इतर हौशी फोटोग्राफर, मित्रांना दाखविले तेव्हा त्यांनी केलेले कौतुक अन् दिलेली शाबासकी म्हणजे पुढे मला फोटोग्राफी छंद अधिकपणे जोपासता आला.