एका क्लिकवर उत्तरपत्रिका तपासण्याची सर्व माहिती मिळणार; सोलापूर विद्यापीठाच्या 'डॅशबोर्ड'चे उद्घाटन
By बाळकृष्ण दोड्डी | Published: July 4, 2023 05:43 PM2023-07-04T17:43:22+5:302023-07-04T17:44:16+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सदरील परीक्षा विभागाचे डॅशबोर्ड आता सर्वांना पहावयास मिळणार आहे.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून विविध अभ्यासक्रमांचे निकाल वेळेत व लवकर जाहीर करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या माहिती संदर्भातील 'डॅशबोर्ड'चे उद्घाटन मंगळवारी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते झाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सदरील परीक्षा विभागाचे डॅशबोर्ड आता सर्वांना पहावयास मिळणार आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सदरील डॅशबोर्डचे उद्घाटन मंगळवारी झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शाह आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी केले.
सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून निर्मिती करण्यात आलेल्या या डॅशबोर्डमध्ये जमा झालेल्या उत्तरपत्रिकांची संख्या, स्कॅनिंग झालेल्या उत्तरपत्रिकांची संख्या, मूल्यमापन होत असलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या, उत्तरपत्रिका तपासत असलेल्या प्राध्यापकांची संख्या, तपासणी पूर्ण झालेल्या व राहिलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या इत्यादी सर्व माहिती या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबर विषय, अभ्यासक्रम निहाय उत्तरपत्रिकांची माहिती मिळणार असल्याने निकाल लवकर लावण्यासाठी या डॅशबोर्डची खूप मोठी मदत परीक्षा विभागास होणार असल्याचा विश्वास प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी यावेळी व्यक्त केला.