एक कोटी रोख देणारे सावकार सोलापुरात; दोनपासून दहा टक्क्यांपर्यंत लावले जाते व्याज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 12:13 PM2020-08-07T12:13:23+5:302020-08-07T12:16:31+5:30
सोलापुरातील शेकडो कुटुंबं या सावकारी पाशामध्ये अडकलेली; सावकाराचा तगादा थांबवण्यासाठी दुसºया सावकाराकडून कर्ज घेतो
सोलापूर : शहरातील सर्वसामान्य कष्टकरी लोक, व्यापारी, नोकरदार, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक इतकेच काय तर सराफांनाही व्याजाने पैसे देतात. समोरच्या व्यक्तीची कुवत पाहून सावकार मंडळी कर्ज देतात. वेळ पडली तर एका दिवसात एक कोटी रुपयांपर्यंतची रोख रक्कम देणारीे सावकार मंडळी सोलापुरात असून, कर्जदारांना महिन्याकाठी दोन टक्क्यांपासून दहा टक्क्यांपर्यंत व्याज लावले जाते.
गिरणगाव म्हणून सोलापूरची ओळख होती, तेव्हापासून आतापर्यंतच्या सावकारी प्रथेची माहिती शहरातील लोकांना आहे. हातावर पोट असणारे लोक दैनंदिन गरजा, धार्मिक कार्य, साखरपुडा, लग्नकार्य आधी कार्यक्रमासाठी नाईलाजास्तव सावकारांकडून व्याजाने पैसे घेतात. एक हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत सावकाराकडून महिन्याकाठी ५ टक्के, दहा टक्के, १५ टक्के,२० टक्के दराने कर्ज घेतात. ज्या दिवशी कर्ज घेतले जाते तेव्हापासून पुढील महिन्यातील तारखेला न चुकता ठरलेले व्याज सावकारांना द्यावे लागते. व्याजाची रक्कम चुकली की त्यावर व्याजाला व्याज लावलं जातं. कर्ज घेतलेली व्यक्ती एका सावकाराचा तगादा थांबवण्यासाठी दुसºया सावकाराकडून कर्ज घेतो. असं करत करत कर्ज घेतलेले लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतात आणि त्यानंतर त्यांच्याजवळ संपत्ती विकून सावकारांची देणी फेडतात. सोलापुरातील शेकडो कुटुंबं या सावकारी पाशामध्ये अडकलेली आहेत. अनेकांचे संसार सावकारांकडून घेतलेल्या कर्जामुळे उद्ध्वस्त झाले आहेत.
एक ते पाच वर्षांपर्यंत होऊ शकतो कारावास
- सावकाराने जर कोरे धनादेश (चेक), कोरा बॉण्ड किंवा अन्य कागदपत्रे घेतल्यास कलम ४२ प्रमाणे २५ हजार रुपयांचा दंड किंवा तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
- मनी लँडिंगचा परवाना असेल तर सावकारांना वर्षाकाठी विनातारण १८ टक्के, तारण ठेवल्यास १५ टक्के दराने व्याज घेता येते. या नियमाचे उल्लंघन झाल्यास कलम ४४ अन्वये पन्नास हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
- मनी लँडिंगचा परवाना नसताना सावकारी करणाºया व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
- कर्जदाराला त्रास दिल्यास संबंधित सावकाराला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा लागू शकते.
तक्रारदार ठाम राहिल्यास शिक्षा नक्की : अॅड. संतोष न्हावकर
एखाद्या व्यक्तीने धाडस करून खासगी सावकाराविरुद्ध जर फिर्याद दिली तर ती पुढे प्रभावीपणे टिकत नाही. सावकार हा
राजकीय वरदहस्ताखाली असतो, शिवाय त्याच्या सर्वत्र ओळखी असतात.
सर्वसामान्य माणसाला केवळ फिर्याद देऊन त्याच्याशी लढा देता येत नाही. खटला
पुढे-मागे जाऊन तडजोडीने मिटवला जातो. फिर्याद देणारी व्यक्ती जर आपल्या तक्रारीवर ठाम राहिली तर सावकाराला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती संतोष न्हावकर यांनी दिली.
२० हजारांचे झाले बारा लाख...
सोलापुरातील एका व्यक्तीने खासगी सावकाराकडून दहा टक्के व्याजाने वीस हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. वीस हजार रुपयांच्या कर्जाला सावकाराने व्याजाला व्याज लावत बारा लाख रुपयांची रक्कम केली आणि त्यासाठी तर रोज तगादा लावला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.