एक दिवस उपवास करून पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 01:03 PM2019-08-13T13:03:10+5:302019-08-13T13:06:29+5:30
सोलापुरातील सुयश गुरूकुलचा उपक्रम; फळे, सरबताचा आहार घेऊन विद्यार्थ्यांचा स्वयंप्रेरणेने सहभाग
सोलापूर : आपल्या खिशातील पैसे पूरग्रस्तांना देऊन मदत करण्यापेक्षा त्यांना होणारा त्रास स्वत:ला अनुभवता यावा. तसेच यातून पूरग्रस्तांना मदतही करता येईल, या उद्देशाने सुयश गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी १२ आॅगस्ट रोजी एक दिवस उपवास केला. या ऐच्छिक उपक्रमात सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला. उपवासाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी फळे, ज्यूस, सरबत आदी पदार्थांचा हलका आहार घेतला.
पश्चिम महाराष्ट्रातील क ोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर आदी भागात पूर आला आहे. यामुळे तेथील पूरग्रस्तांना खाण्या-पिण्यासोबतच दैनंदिन वापराच्या वस्तूंची गरज आहे. तिथे राहणाºया नागरिकांपुढे कोणती परिस्थिती आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर व वृत्तपत्र कात्रणाच्या माध्यमातून देण्यात आली. आपण काय करू शकतो, असे विद्यार्थ्यांना विचारल्यावर त्यांनी एक दिवस उपवास करण्याची संकल्पना सांगितली. या उपक्रमात बहुतांश विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. थकवा येऊ नये, यासाठी फळे, ज्यूस, सरबतसारखी पेये तसेच इतर बाबींची सोयही करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना जेवण करायचे आहे त्यांना तशी परवानगी देण्यात आली.
अभ्यास आनंददायी करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये घेण्यात येतात. यासाठी क्षेत्रभेटीचेही आयोजन करण्यात येते. शाळेमध्ये एनसीसीचे निवासी शिबीर घेण्यात येते. यात सुमारे ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या शिबिरात रोप ट्रेनिंग, हॉर्स रायडिंग आदींचे प्रशिक्षण दिले जाते. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी युवा दिन साजरा करण्यात येतो. विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी गुरुकुलमध्ये येत असतात. या उपक्रमांतर्गत करिअरबाबत मार्गदर्शन केले जाते. शाळेतर्फे एक दिवसाच्या सहलीचे आयोजन करण्यात येते. या सहलीमधून विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळावी यादृष्टीने विविध प्रकल्पांना भेट दिली जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखील साजरा करण्यात येतो. अशा विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सुलभा पिशवीकर, सचिव केशव शिंदे यांचे मार्गदर्शन असते.
पूरग्रस्तांना वही, पुस्तक ांची मदत
- सुयश गुरुकुल ही निवासी शाळा असल्याने विद्यार्थी शाळेतच राहतात. या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेले वही, पुस्तक, पेन आदी शैक्षणिक साहित्यिक तसेच टूथ ब्रश, पेस्ट, चप्पल, बूट, कपडे आदी साहित्य देखील विद्यार्थ्यांनी एकत्रित केले आहेत. आणखी एक ते दोन दिवस असे साहित्य एकत्रित केल्यानंतर पूरग्रस्तांपर्यंत हे पोचविण्यात येणार आहे. गुरुकुलमधील शिक्षक तसेच कर्मचारीदेखील आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत.
सुयश गुरुकुलचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना चांगला मनुष्य घडविणे हा आहे. या आधारावरच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासाबरोबरच खेळ व कला यांनाही प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठीच शाळेमध्ये १५ प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच २४ प्रकारच्या विविध कलाही शिकविण्यात येतात.
- विद्या शिंदे
मुख्याध्यापिका, सुयश गुरुकुल