एकाच प्रचार गाडीचा खर्च चारवेळा धरता, आम्हाला तुमचा हिशोब मान्य नाही..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 04:57 PM2019-04-12T16:57:09+5:302019-04-12T16:58:48+5:30
सोलापूर लोकसभेच्या उमेदवारांनी घेतली खर्च नियंत्रण खात्यापुढे भूमिका
सोलापूर : प्रचार करण्यासाठी लावण्यात आलेले वाहन एकाच दिवशी चार तालुक्यांत प्रचार करून परत येते. असे असतानाही त्या चार तालुक्यांत फिरलेल्या एकाच वाहनाचा खर्च निवडणूक यंत्रणेकडून चार वेळा लावण्यात आला आहे़ त्यामुळे तुम्ही आमच्यावर लावलेली खर्चाची रक्कम आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी घेतली आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा खर्च निवडणूक खर्च नियंत्रण विभागाने सुमारे ३५ लाख रुपयांपर्यंत काढला आहे. अन्य दोन्ही प्रमुख उमेदवारांचा खर्चही १५ लाखांच्या पुढे रजिस्टरला नोंदविण्यात आला आहे. शुक्रवारी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या खर्च तपासणीदरम्यानही उमेदवाराच्या रजिस्टरमधील व निवडणूक खर्च विभागाच्या रजिस्टरमध्ये फरक आढळून आला.
प्रचारासाठी लावण्यात आलेला खर्च हा अवास्तव जास्त लावण्यात आल्याची प्रमुख भूमिका सर्वच उमेदवारांनी घेतल्याने निवडणूक खर्च विभागाने याबाबत पुन्हा तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी वाहनांच्या क्रमांकावरून खात्री करून पुन्हा एकदा तपासणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती खर्च विभागाचे समन्वय अधिकारी तथा जि.प. मुख्य व लेखा अधिकारी महेश आवताडे यांनी दिली.
खर्चनिरीक्षकांना उमेदवारांचे उत्तर
- काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, भाजपचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर व वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी खर्च कमी दाखविल्याने काही दिवसांपूर्वी खर्चनिरीक्षक यांनी त्यांना नोटीस दिली होती. याबाबत दोन दिवसांत लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तिन्ही उमेदवारांनी लेखी खुलासा दिला असून, काही खर्च मान्य असून, काही खर्च विनाकारण दाखविण्यात आल्याने हा खर्च मान्य नसल्याची भूमिका उमेदवारांनी घेतली आहे.