कोरोनाला रोखण्यासाठी सोलापूर रेल्वे स्टेशनवर ‘वन एन्ट्री...वन एक्झिट’ गेट
By Appasaheb.patil | Published: October 20, 2020 11:33 AM2020-10-20T11:33:35+5:302020-10-20T11:36:45+5:30
‘आरपीएफ’पोलिसांची संकल्पना; प्रवाशांकडून कोरोना रोखण्यासाठी केल्या उपाययोजना
सोलापूर : रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ‘आरपीएफ’ (रेल्वे सुरक्षा बल) च्या टीमने सोलापूर रेल्वे स्थानकावर लाल कलरमध्ये चैनची बॅरिगेटींग करून ‘वन एन्ट्री...वन एक्झिट’ संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख श्रेयस चिंचवाडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आले़ लॉकडाऊनमुळे रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या होत्या, तब्बल ६ महिन्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून हळूहळू रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत़ आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सुचनांचे पालन करीत रेल्वेने प्रवाशांपासून कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत़ रेल्वेने प्रवास करणारे व परजिल्हा किंवा परराज्यातून आलेल्या लोकांसाठी वेगळा मार्ग करण्यात येत आहे़ शिवाय प्रवाशांना उभारण्यासाठी स्थानक, तिकीट खिडकी, रेल्वे गेट यासह अन्य स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी हजारो मार्किंग आरपीएफने केल्या आहेत़ कोणत्याही प्रवाशांपासून कोरोनाचा संसर्ग होणार याची पूर्णपणे जबाबदारी रेल्वेच्या सुरक्षा बलाने घेतली आहे.
------------
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ५० जवान तैनात...
फिजिकल डिस्टन्सचे पालन व्हावे यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ शिवाय प्रवाशांनी रेल्वे प्रवासावेळी मास्क वापरणे, सॅनिटायझर बाळगणे याशिवाय आरोग्य विभागाने दिलेल्या विविध सुचनांचे पोस्टर स्थानकावर झळकाविण्यात आले आहेत़ कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे पालन करण्यासाठी स्थानकावर ५० आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत़
राज्याराज्यातील प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात़ कोणत्याही प्रवाशांकडून कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आरपीएफ पोलिसांकडून खबरदारी व उपाययोजना आखण्यात येत आहेत़ सोलापूर रेल्वे स्थानकावर नव्याने ‘वन एन्ट्री़़़वन एक्झिट’ गेट तयार करण्यात आले आहे़ प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलास सहकार्य करावे़
- श्रेयस चिंचवाडे,
सुरक्षा आयुक्त ,आरपीएफ, सोलापूर विभाग