धक्कादायक; एकीकडे अंत्यसंस्कार होत असताना दुसरीकडे घरात ‘तिसरा’चा विधी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 01:12 PM2020-06-20T13:12:51+5:302020-06-20T13:12:57+5:30
तीन दिवस मृतदेह रुग्णालयातच; ‘विद्युतदाहिनी बंद अन् लाकडांची टंचाई’मुळे मृत्यूनंतरही हेळसांड
रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : संकटं आली तर एकामागून एक येतात. कोरोनामुळे पतीचा जीव गेला. त्याच्या उपचारासाठी आकाश पाताळ एक केलं अन् दिवस रात्रही. इकडून-तिकडून पैसे आणून पत्नीने बिल भरले. मात्र, नंतर तब्बल तीन दिवस मृतदेह रुग्णालयातच ठेवला गेला. कारण काय तर म्हणे.. विद्युतदाहिनी बंद आहे अन् लाकडांची टंचाई झाली आहे.
पूर्व मंगळवार पेठेतील बोरामणी तालमीजवळ राहणाºया एका ४५ वर्षीय व्यक्तीला ९ जून रोजी खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यात थोडा तापही होताच. मेडिकल दुकानांमधून आणलेल्या गोळ्यांवर त्यांनी किरकोळ समजणारा आजार अंगावर काढला. मात्र, त्रास वाढल्यानंतर त्यांना खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. गांभीर्य ओळखून त्यांना सोलापुरातील एका मोठ्या सहकारी रुग्णालयात हलवले. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी मृत्यू झाला.
दरम्यान, पत्नीने पतीच्या मृतदेहाची मागणी केली. मात्र रुग्णालयाच्या प्रशासनाने अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रेत देता येत नसल्याचे स्पष्ट केले. सोमवारी सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनाने तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागाला आणि अधिकाºयांना कळवले. तरीही दोन दिवस मृतदेह रुग्णालयातच पडून होता.
परिसरातील नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी महापालिकेच्या प्रशासनास जाब विचारला. तेव्हा कुठे महापालिकेस जाग आली आणि बुधवारी मृत कुटूंबीयाच्या घरी तिसरा विधी सुरु असताना महापालिकेने त्या कोरोनाबाधित रुग्णावर अखेर अंत्यसंस्कार केले.
पत्नी-मुलांनी टेस्ट स्वत:च करून घेतली !
- सोमवारी या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तीन दिवस उलटून गेले तरी मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नव्हते. अडचणी दूर झाल्यानंतर नियमानुसार परस्पर अंत्यसंस्कार केले गेले. मात्र त्याच्या पत्नीची अन् दोन लहान मुलांची कोरोनाची चाचणी घेण्यासाठी कुणीच आले नाही. अखेर कोणीच न आल्याने मृताच्या पत्नीने आपल्या दोन मुलांना घेऊन मजरेवाडी येथील महापालिकेचा दवाखाना गाठला. तेथेही अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना ताटकळत ठेवले गेले. शेवटी तपासणीनंतर ती माता आपल्या मुलासह घरी परतली.