डिसेंबरअखेर शंभर टक्के लसीकरण करणार; सोलापूर जिल्हा आरोग्य समितीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 07:52 PM2021-12-10T19:52:19+5:302021-12-10T19:52:22+5:30
आरोग्य समिती: तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज
सोलापूर: तिसऱ्या लाटेसाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज असून, डिसेंबरअखेर शंभर टक्के लसीकरण करण्याचे नियाजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी शुक्रवारी दिली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची सभा झाली.सभेला नीलकंठ देशमुख ,अरुण तोडकर , अण्णाराव बाराचारे, अतुल खरात , स्वाती कांबळे उपस्थित हाेते. कोरोनाचा नवा ओमायक्रॉन विषाणू व त्यादृष्टीने आरोग्य विभागाने काय तयारी केली असा सवाल सभापती चव्हाण यांनी उपस्थित केला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी ओमायक्रॉनबाबत सविस्तर माहिती दिली. संभाव्या तिसऱ्या लाटेबाबत आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज आहे. लसीकरण झालेल्यांना नव्या विषाणूची भीती नाही. त्यामुळे डिसेंबरअखेर जिल्ह्यातील शंभर टक्के लोकांना लस देण्याचे उदिष्ठ पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावर सभापती चव्हाण यांनी प्रत्येकांनी आपल्या गावातील लसीकरण पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचना दिल्या.
यावेळी रोपळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोवीड योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पदोन्नती झाल्याबद्दल जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी तथा लसीकरण समन्वयक डॉ अनिरुद्ध पिंपळे यांचाही सभापती चव्हाण यांनी सन्मान केला. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे, डॉ अमित पाटील, डॉ. संतोष जोगदंड उपस्थित होते.
ॲम्बुलन्सची खरेदी कधी
शासनाने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजातून ॲम्बुलन्स खरेदीला परवानगी दिली होती. याला वर्ष होत आले तरी ॲम्बुलन्स खरेदी का करण्यात आल्या नाहीत असा सवाल तोडकर यांनी केला. त्यावर ग्रामपंचायत विभागाकडून याला विलंब झाला असून पाठुपुरावा करण्यात येईल असे सभापती चव्हाण यांनी सांगितले.
पदोन्नती झाल्याबद्दल जिल्हा लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांचा सन्मान करताना आरोग्य सभापती दिलीप चव्हाण, याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, नीलकंठ देशमुख ,अरुण तोडकर , अण्णाराव बाराचारे,नीलकंठ देशमुख ,अरुण तोडकर , अण्णाराव बाराचारे आदी दिसत आहेत.