तलवारीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी; सांगोला तालुक्यातील घटना
By Appasaheb.patil | Updated: October 16, 2022 18:42 IST2022-10-16T18:42:26+5:302022-10-16T18:42:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क

तलवारीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी; सांगोला तालुक्यातील घटना
सांगोला/सोलापूर : पूर्व वैमनस्यातून ९ जणांनी मिळून जीपची काच फोडली. त्यानंतर दोघांना गाडीतून बाहेर काढून नऊ जणांनी मिळून दोघांवर तलवारीने वार केले. त्यात पित्याचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. मात्र रविवारी सायंकाळी चार वाजता याबाबतचा गुन्हा सांगोला पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही घटना शनिवारी रात्री ८ च्या सुमारास जवळा ते घेरडी (ता सांगोला) जाणारे रोडवरील गावडेवाडी ओढ्यानजीक घडली. गंगाराम संतु गावडे (६५) असे मृताचे नाव आहे तर विजय गंगाराम गावडे (३२) असे जखमी मुलाचे नाव आहे. याबाबत. जखमी विजय गंगाराम गावडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सुरेश मुत्त्याप्पा खांडेकर, अंकुश कड्याप्पा खांडेकर, राजू मुत्त्याप्पा खांडेकर, शाहूबा बापू खांडेकर, आनंदा मुत्याप्पा खांडेकर, बाबा बिरा लवटे, तातोबा खांडेकर, बापू तातोबा खांडेकर (सर्वजण रा. गावडेवाडी ता. सांगोला) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन जखमी विजय गावडे यांच्याकडून घटनेची माहिती घेतली.