‘पोटरा’ चित्रपटातील छकुलीला एक लाखाची मदत; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 10:53 AM2022-05-18T10:53:01+5:302022-05-18T10:53:08+5:30
सोलापूरच्या कन्येला मिळाली मोठी मदत
सोलापूर : कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार छकुली देवकर हिला एक लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. छकुलीची कौटुंबिक परिस्थिती बिकट असल्याने ही मदत देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या निर्देशानंतर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांनी एक लाख रुपयांचा धनादेश देण्याची घोषणा केली.
‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार छकुली प्रल्हाद देवकर (वय १५) हिचा ‘पोटरा’ हा पहिला चित्रपट असून, यापूर्वी तिने कोणत्याही चित्रपट अथवा नाटकात भूमिका केलेली नाही. पोटरा चित्रपटात काम केलेल्या छकुलीच्या कुटुंबाची स्थिती कळाल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चित्रनगरी प्रशासनाने तत्काळ पावले उचलली. छकुलीला एक लाख रुपयांचा धनादेश आणि अभिनय क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी तिच्या कुटुंबीयांच्या सल्ल्याने महामंडळाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांनी जाहीर केले.
फ्रान्समध्ये १७ ते २८ मेदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोलापूर जिल्ह्यात तयार झालेल्या ‘पोटरा’ चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर धोत्रे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते शरद शिंगाडे असून, चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मंगळवेढा तालुका आणि मोहोळ तालुक्यात झाले आहे.
---------
छकुली राहते पालेत
पोटरा या चित्रपटात मुख्य अभिनेत्री छकुलीने काम केले आहे. ती दहावीमध्ये शिकत असून, मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावी एका ओढ्याच्या कडेला पालाच्या झोपडीत राहत आहे. गीता मरीआईवाले समाजातील असून, तिची आई डोक्यावर मरीआई या देवीचा गाडा घेऊन गावोगावी फिरते. त्यावरच छकुलीच्या घरच्यांचा उदरनिर्वाह आहे.