विहाळमधील एक महिन्याचे रेशनचे धान्य गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:22 AM2021-04-25T04:22:26+5:302021-04-25T04:22:26+5:30
विहाळ येथील रेशन दुकानदार वर्षभरात गहू १५ रुपये, तर तांदूळ १८ रुपये किलो दराने काळ्या बाजारात विकणे, पावती न ...
विहाळ येथील रेशन दुकानदार वर्षभरात गहू १५ रुपये, तर तांदूळ १८ रुपये किलो दराने काळ्या बाजारात विकणे,
पावती न देणे, जादा पैसे घेणे, महिलांना अरेरावीची भाषा वापरणे, दुकान वेळेत न उघडणे अशा अनेक तक्रारी तहसील कार्यालयाकडे दाखल झाल्या आहेत; परंतु या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मार्च २०२१ चे धान्य आल्यानंतर रेशन दुकानदार अनिल भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मार्चमधील धान्यवाटप केले नाही. त्यानंतर रेशन दुकानदार कोरोनातून बरे होऊन आल्यानंतर एप्रिल महिन्याचा माल वाटण्यास सुरुवात केली. याबाबत रेशन दुकानदारास ग्रामपंचायत सदस्य मोहन मारकड, कृष्णा मारकड यांनी मागील महिन्यातील माल लोकांना मिळणार का? असे विचारले असता ते तुम्ही ऑफिसला जाऊन विचारा, मला विचारायचे नाही, असे उत्तर भुजबळ यांनी दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रेशन दुकानदार भुजबळ यास चांगलेच धारेवर धरले.
ग्रामपंचायत सदस्य मोहन मारकड, कृष्णा मारकड यांनी याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी, तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांना निवेदन पाठविले आहे.
कोट :::::::
मी सकाळी रेशनचा माल घेण्यासाठी आले तर भुजबळ यांनी इथे काय माणसे मारायला आलाय का? असे म्हणून मला दुकानाच्या बाहेर हाकलले.
-
पद्मिनी प्रभाकर मारकड,
रेशनधारक
विहाळ
कोट ::::::::::
गेली वर्षभरापासून विहाळ येथील रेशन दुकानदार अनिल भुजबळ यांच्या अनेक वेळा तहसील कार्यालय, पुरवठा विभाग यांच्याकडे तक्रार केल्या. मात्र, त्यांना पाठीशी घातले जात आहे. कमीत कमी कोरोना काळात तरी रेशनचे धान्य व्यवस्थित मिळावे.
मार्च महिन्यातील माल वाटला नाही. हा माल नेमका गेला कुठे हे रेशन दुकानदार सांगत नाहीत. उलट तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणून अरेरावीची भाषा वापरतात.
-
मोहन मारकड,
ग्रामपंचायत सदस्य
कोट :::::::::
मी कोरोना पॉझिटिव्ह आलो होतो. मी किती माल वाटप केला हे तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागास कळवले आहे. त्यामुळे यावर मी काही बोलू शकत नाही. तुम्ही त्यांना विचारा.
- अनिल भुजबळ,
रेशन दुकानदार, विहाळ