मंगळवेढा कारागृहातील २८ कैद्यांसह एक पोलीस, दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:23 AM2020-07-18T07:23:19+5:302020-07-18T07:26:46+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
मंगळवेढा : मल्लिकार्जुन देशमुखे
कोरोनासारख्या संकट काळात जिवाची पर्वा न करता मागिल चार महिन्यापासून रात्रंदिवस झ़टणाऱ्या ग्रामीण पोलिस दलात कोरोनाने शिरकाव केला आहे. मंगळवेढा पोलिस ठाण्यातील एक अधिकारी व दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्याचबरोबर पोलीस ठाण्याबरोबर कारागृहातही कोरोनाने मोठा शिरकाव केला असून तब्बल २८ कैदी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. दरम्यान कोव्हिडं योद्धा असणारे डॉक्टर बरोबर पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनासमोर संकट वाढले आहे.
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट बनत चालला असून को कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कारागृहात व पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शुक्रवारी कैदी, पोलीस बरोबर ११९ जणांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. यामध्ये ४० कैदी पैकी २८ पॉझिटिव्ह आढळले तर १२ निगेटिव्ह आढळले तसेच कैद्यांना जेवणाचे डबे देणारा एकजण पॉझिटिव्ह आला आहे.
पोलिसांच्या घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये एक पोलीस अधिकारी व दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले. यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत.
कारागृह प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून गत तीन महिन्यांपासून कोरोनाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू होते; मात्र शुक्रवारी रात्री कारागृहातील सुमारे २८ कैद्यांना व ३ पोलिसांना कोरोना असल्याचा अहवाल पॉझीटीव्ह असल्याचे समोर येताच प्रशासनाला धक्का बसला. आता खबरदारी म्हणूण कैद्यांसाठी स्वतंत्र कोवीड सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहे. या ठिकाणावरुन कैदी पळून जाणार नाहीत, तसेच त्यांना उपचारही मिळावे, या दृष्टीने त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, तर १२ निगेटिव्ह कैद्यांना नवीन तहसील कार्यालयात तात्पुरते जेल स्थापन करून विलगिकरण करण्यात आले आहे. यामध्ये न्यायालयीन कोठडीतील पाच पुरुष व दोन महिला व पोलीस कोठडीतील पाच पुरुष कैदी असा १२ जणांचा समावेश आहे आतापर्यंत ग्रामीण व शहराच्या विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्य वाढतीच होती; मात्र आता पोलिस व कारागृहातही कोरोनाने शिरकाव केल्यामुळे पोलिस प्रशासनावर मोठे संकट आले आहे. तर सलगर येथील डॉक्टरांच्या संपर्कातील एक परिचारिका व एक लिपिक असे दोघेजण पॉझिटिव्ह आढळले आहे.
______________________________
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयमध्ये शुक्रवारी ११९ रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या, यामध्ये २८ कैदी, एक पोलीस अधिकारी व दोन सुरक्षा रक्षक व एक आहार पुरवठादार असे ३२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. १२ कैदीचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यांना तहसील कार्यालय येथे जेल स्थापन करून विलगीकरण केले आहे.
- उदयसिंह भोसले, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा