शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर दूध खरेदी दरात एक रुपयाची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:58+5:302021-06-27T04:15:58+5:30
वर्षभरात एखादा महिना दूध खरेदी दर शेतकऱ्यांना परवडणारा (प्रतिलिटर ३० रुपये) असतो. उर्वरित ११ महिने प्रतिलिटर २० ते २५ ...
वर्षभरात एखादा महिना दूध खरेदी दर शेतकऱ्यांना परवडणारा (प्रतिलिटर ३० रुपये) असतो. उर्वरित ११ महिने प्रतिलिटर २० ते २५ रुपयेच शेतकऱ्यांच्या हातावर टेकवले जातात. खासगी दूध संघावर आपण कारवाई करू शकत नाही, असे शासन दरबारी सगळेच सांगत असल्याने व्यथा मांडायचा शेतकऱ्यांचा प्रश्नच येत नाही. पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली, शिवाय इंधनाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ झाली. मात्र दुधाचा दर खासगी संघ देतील तो घ्यावा लागतोय.
लाॅकडाऊन झाल्यानंतर खासगी दूध संघांनी गाय दूध खरेदी दर २० रुपयांवर आणला आहे. आम्ही शेतकऱ्यांना २१ रुपये दर देत आहोत, असे संघाचे मालक सांगत असले तरी शेतकऱ्यांना मात्र १९-२० रुपये इतकाच दर गावपातळीवरील संकलन केंद्र देत आहेत. ही बाब लक्षात घेऊन रयत क्रांती व किसान सभा या संघटनांनी दरासाठी आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी संघटना व दूध संघचालकांची बैठक घेतली. शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची शासन दखल घेऊ लागल्याने खासगी संघांनी २६ जूनपासून दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ केली आहे.
----ऑनलाइन २४ रुपये दर..
संकलन केंद्रावर दूध घातलेल्या प्रतिलिटर २४ रुपयांप्रमाणे पैसे ऑनलाइन थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करतो, असे सोनाई दूध संघांच्या दशरथ माने यांनी सांगितले. शेतकऱ्यांना प्रतिलिटर २४ रुपये व संचालक केंद्राला प्रतिलिटर ८० पैसे देतो, असे माने म्हणाले. त्यामुळे आम्ही दर कमी केला असे म्हणता येणार नाही, असे सोनाईच्या माने यांनी सांगितले.
----
आम्ही संकलन केंद्राला प्रतिलिटरला २३ रुपये दर देत होतो. त्यात शनिवारपासून एक रुपया वाढ केला आहे. लाॅकडाऊन होता त्यामुळे दूध विक्रीचा प्रश्न आमच्यासमोर होता. आणखीन लाॅकडाऊनची भीती आहे. दर कसा वाढवायचा?
- दशरथ माने, सोनाई दूध, इंदापूर पुणे