सख्ख्या भावाला दिलेला धनादेश न वटल्याने एकास तीन महिन्यांची कैद, १० लाख भरपाईचे आदेश
By दिपक दुपारगुडे | Published: February 7, 2024 07:36 PM2024-02-07T19:36:51+5:302024-02-07T19:36:55+5:30
वाटपावेळी फिर्यादीच्या हिश्श्याला आलेले पैसे सौदागर यांनी उसाचे बिल आल्यानंतर देण्याचे ठरले.
सोलापूर: तांबवे (ता. माढा) येथील महादेव वामन गोडसे यांना सख्खा भाऊ सौदागर वामन गोडसे (रा. इंदापूर) यांनी ६ लाख १० हजार १६ रुपयांचा धनादेश दिला. तो पुरेशा रकमेअभावी न वटल्याने माढा येथील न्यायदंडाधिकारी यांनी सौदागर वामन गोडसे यास तीन महिन्यांची साधी कैदेची शिक्षा ठोठावली. धनादेशची नुकसानभरपाई म्हणून दहा लाख रुपये हे निकाल तारखेपासून एका महिन्यात फिर्यादीस देण्याचा हुकूम दिला आहे व रक्कम न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महादेव वामन गोडसे यांचा सौदागर वामन गोडसे हा सख्खा भाऊ आहे. फिर्यादी महादेव व त्याचा दुसरा भाऊ राजाराम व वडील वामन नारायण गोडसे यांचे एकत्रित कुटुंब मालकीच्या वहिवाटीचे कन्हेरगाव, टेंभुर्णी, तांबवे येथे जमिनी व जागा होत्या. सदर जमिनी व जागांचे फिर्यादी महादेव गोडसे व सौदागर गोडसे व दुसरा भाऊ राजाराम, वडील वामन यांच्या दरम्यान जुलै-२०१० रोजी तोंडी वाटप झाले होते. तोंडी वाटपात ठरल्याप्रमाणे सर्वांना जमिनी व जागेचे वाटप ठरले होते. या वाटपावेळी फिर्यादी महादेव गोडसे यांच्या हिश्श्याला ६ लाख १० हजार १६ रुपये आले व आरोपीच्या हिश्श्यात टेंभुर्णी येथील प्लॉट व जागा आली.
वाटपावेळी फिर्यादीच्या हिश्श्याला आलेले पैसे सौदागर यांनी उसाचे बिल आल्यानंतर देण्याचे ठरले. त्याप्रमाणे फिर्यादीने आरोपीस रकमेची मागणी केली असता आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्र, निमगाव शाखेचा संबंधित रकमेचा धनादेश फिर्यादीला दिला होता. तो पुरेशा निधीअभावी न वटता परत आल्याने वकिलामार्फत नोटीस देऊन धनादेशच्या रकमेची मागणी केली. यावरून फिर्यादीकडून ॲड. प्रमोद मोतीलाल पलसे यांनी माढा येथील प्रथमवर्ग न्याय अधिकारी यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात फिर्यादीची साक्ष व साक्षीदारामार्फत जबाब घेऊन केस शाबित केल्याने आरोपीस शिक्षा झाली आहे. यात फिर्यादी महादेव गोडसे तर्फे ॲड. प्रमोद पलसे, ॲड. विनोद सी. दरगड यांनी तर आरोपीतर्फे ॲड. नागराज शिंदे, ॲड. टी.आर. तांबोळी, ॲड. एस.एन. कदम यांनी काम पाहिले.