पीडित महिलांसाठी सोलापुरात वन स्टॉप सेंटर उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:45 AM2018-04-15T11:45:59+5:302018-04-15T11:45:59+5:30
पीडित महिलांना वैद्यकीय, पोलीस आणि कायदेविषयक मदत करण्यासाठी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत मिळणारे वन स्टॉप सेंटर सोलापूर येथे उभारण्यात येणार आहे.
अकलूज : पीडित महिलांना वैद्यकीय, पोलीस आणि कायदेविषयक मदत करण्यासाठी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयामार्फत मिळणारे वन स्टॉप सेंटर सोलापूर येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १८ रोजी सोलापूर येथे बैठकीचे आयोजन केल्याची माहिती खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
या संदर्भात खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ़ नारायण पाटील, जि़ प़ सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयकुमार खोमणे, पर्यवेक्षक नितीन जाधव, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी नितीन थोरात यांची गुरुवारी अकलूज येथे बैठक झाली. येथील डॉटर मॉम फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्याकडे महिलांसाठी या तीन मागण्या केल्या होत्या. मनेका गांधी यांनी या तीन योजना देण्याचे मान्यही केले आहे. पीडित महिलांना न्याय व आधार देण्यासाठी असलेली वन स्टॉप सेंटर ही योजना जिल्ह्याच्या ठिकाणी असावी, असे निकष आहेत. निराधार महिलांना आधार देणारे शेल्टर होम करमाळा येथे सुरु करण्यात येणार असल्याचे खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. वर्किंग वुमेन होस्टेल कोठे सुरु करायचे या संदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही़
या योजनांचे प्रस्ताव तयार करणे व त्या संबंधित निर्णय घेण्यासाठी १८ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. राज्यातील ३६ पैकी ९ जिल्ह्यात हे सेंटर
काय आहेत अटी.......
- वन स्टॉप सेंटरसाठी ३५०० चौरस फूट जागेची गरज असून, राज्यातील ३६ पैकी केवळ ९ जिल्ह्यात असे सेंटर सुरु आहे. इमारतीसाठी ३७ लाखांचा निधी केंद्राकडून मिळणार आहे़ ३० महिला क्षमतेच्या शल्टर होमच्या इमारतीसाठी ४० लाखांचा निधी मिळतो. ३० महिलांच्या पोषणासाठी प्रतिवर्षी नऊ लाख व त्यातील स्टाफसाठी साडेपाच लाख मिळतात.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाची योजना आहे. महाराष्ट्रात केवळ नऊ जिल्ह्यात असे सेंटर उपलब्ध आहेत़ खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून सोलापुरात हे सेंटर सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
- शीतलदेवी मोहिते-पाटील,
अध्यक्ष, डॉटर मॉम फाउंडेशन, अकलूज