एक वर्ष झाले तरी ‘कोरोना’चे भूत कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:23 AM2021-03-23T04:23:27+5:302021-03-23T04:23:27+5:30
२२ मार्च २०२० रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत लोकांना घरातच राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र ...
२२ मार्च २०२० रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत लोकांना घरातच राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करताना भारतात लॉकडाऊनची घोषणा केली. घराघरात लोकांना टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल फोनवरून लागलीच माहिती मिळाली. पुढच्या २१ दिवसांची तजवीज करण्यासाठी दुकानांबाहेर गर्दी करून लोकांनी साठाही करून घेतला.
या देशातला एक वर्ग लॉकडाऊन झाला, पण हातावर पोट असणारा या देशातील मोठा वर्ग आपोआप रस्त्यावर आला. शासनाने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर नागरिकांची भंबेरी उडाली होती. चौकाचौकात तसेच ग्रामीण भागात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात होती. तसेच अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत होती. त्यादिवशी अनेक व्यक्तींवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला.
अचानक लागलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय ठप्प झाले होते. मोठ्या शहरातून रोजगारासाठी गेलेल्यांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यामुळे शेकडो लोक बेरोजगार झाले. बाहेरगावी असलेल्या मजुरांचे लोंढे ग्रामीण भागातून परतू लागले. सार्वजनिक वाहतूक नसल्याने अनेक लोक आपापल्या गावी पायी चालत परतू लागले, हे चित्र पहायला मिळाले होते. त्यामुळे अक्षरश: सर्व व्यवहार ठप्प होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद होते. तेव्हापासून आजही कोरोनाचे भूत कायम आहे. एक वर्ष झाले तरी अद्याप कोरोनाची साखळी तोडण्यास शासन-प्रशासनाला यश आले नाही आणि त्यासंदर्भात नागरिकांनी गांभीर्यही घेतले नाही. यापुढेही कोरोनाशी दोन हात करून जगावे लागणार आहे.