कांदा लागवडीचा एकरी खर्च साठ हजार अन् मदत आठ हजार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:32 PM2019-11-22T12:32:47+5:302019-11-22T12:35:06+5:30
शेतकºयांनी चिखलातून कांदा बाहेर काढला व बाजरी, मका ही पिके उपटून बांधावर टाकली.
नासीर कबीर
करमाळा : कांदा लागवड करण्यासाठी एका हेक्टरला खर्च आला ६० हजार अन् शासन देणार हेक्टरी ८ हजार रूपये.. हा कुठला न्याय आहे? सरकारने शेती करून पाहावी मग कळेल़़़ हा संतप्त सवाल भिवरवाडी (ता.करमाळा) येथील युवा शेतकरी रवी पाटील यांनी केला आहे. ही मदत तुटपुंजी असून, राज्यपालांनी या नुकसानभरपाईवर पुनर्विचार करावा, अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकºयांनी केली आहे.
आॅक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने करमाळा तालुक्यात हातातोंडाला आलेला कांदा, बाजरी, मका या उभ्या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने जमिनीतच कांदा नासला तर मका व बाजरी चिखलात सडली. शेतकºयांनी चिखलातून कांदा बाहेर काढला व बाजरी, मका ही पिके उपटून बांधावर टाकली. महिनाभरापासून राज्यसरकार स्थापन होईना़ अखेर राष्ट्रपती राजवट लागली़ राज्याचा कारभार हाकणाºया राज्यपालांनी पीक नुकसानग्रस्तांना हेक्टरी ८ हजार रूपये भरपाई देण्याचे जाहीर केले आहे़ ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे़ बळीराजाची एक प्रकारे चेष्टाच झाल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे़ करमाळा तालुक्यात भिवरवाडी, शेलगाव-वा, कोर्टी, रोसेवाडी, हिवरवाडी, भोसे या भागातील शिवारात प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन शेतकºयांशी संवाद साधला.
भिवरवाडी येथील दिलीप विनायक पाटील यांचे पुतणे रवी पाटील यांनी नुकसानीचे अनुभव कथन केले़ अडीच एकर कांदा लागवड केली होती. परतीच्या पावसाने हातातोंडाला आलेला कांदा चिखल झालेल्या पाण्यात गेला़ जिथं २०० ते २५० पिशव्या कांदा होईल असे वाटत असताना नुकसानीमुळे १० ते १५ पिशव्याच हाताला लागल्या. एक एकर शेत नांगरट करून मशागत करायला हेक्टरी ५ हजार रूपये, कांदा रोप विकत आणून लागणीस १५ हजार रूपये, दोनदा खुरपणी करायला २ हजार रूपये, खते व औषधे फवारणी २ हजार रूपये अशाप्रकारे एकरी २४ हजार रूपये खर्च आला आहे़ एकूण लागवड खर्च पाहता एक हेक्टरला निव्वळ ६० हजार रूपये खर्च येत असल्याचे वास्तव अनेक शेतकºयांनी सांगितले.
मका सडली शेतात.. कांद्याचा खर्चही निघाला नाही
- दोन एकर मका परतीच्या पावसात सडला़ कृषी कार्यालय, तलाठी कार्यालय यांच्याकडे हेलपाटे मारून मका पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून दिले़ कांद्याचा पंचनामा करण्याबाबत सूचना नसल्याचे सांगितले जात होते़ शेवटी दोघांमध्ये वाद झाला़मग पंचनामा झाला, अशी व्यथा शेलगावचे सोमनाथ केकान या शेतकºयानं व्यक्त केली तर भिवरवाडीचे रामभाऊ कांबळे म्हणाले, दीड एकर कांदा लावला होता़ परतीच्या पावसानं दहा पिशव्याही कांदा हाती लागला नाही. इंदापूरच्या अडत बाजारात ५ रूपये किलो दराने विकला. जाण्या-येण्याचा खर्च सुध्दा निघाला नाही, अशा स्थितीत सरकारनं मदत वाढवावी, असं त्यांच्या म्हणणं आहे.