कांद्याला सोलापुरात प्रति क्विंटल कांद्याला नऊ हजारांचा भाव मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:06 PM2020-10-20T12:06:44+5:302020-10-20T12:08:27+5:30
नाशिकपेक्षाही अधिक दर; पावसाने झोडपल्यामुळे आवक झाली कमी
सोलापूर: पावसाने झालेल्या नुकसानीमुळे आवक फार अशी वाढत नाही. यामुळे कांद्याच्या दरात वरचेवर वाढ होत असून सोमवारी सोलापूरबाजार समितीत क्विंटलचा भाव ९ हजारांवर पोहोचला. सोलापूर पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील उमराणा बाजार समितीत ८ हजार ६०१ रुपये इतका दर मिळाला आहे.
राज्यातील कांदा पीक अतिपावसामुळे नुकसानीत आले आहे. कांदा पिकांतील अक्षरश: पाणी हटेना झाले आहे. अगोदर लागवड झालेल्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकºयांना औषध फवारणीवर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला आहे. मोठा खर्च करुन वाचविलेला कांदा धो-धो पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे नवा कांदा बाजारात फारच कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याचा वरचेवर भाव वाढत आहे.
सोमवारी सोलापूर बाजार समितीत क्विंटलला ९ हजार रुपये इतका दर मिळाला. नाशिक जिल्ह्यातील उमराणा बाजार समितीत सर्वाधिक ८ हजार ६०१ रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. अहमदनगर बाजार समितीत क्विंटलला ८ हजार तर चांदवड बाजार समितीत ७ हजार ५०० रुपये दराने कांदा विक्री झाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ८ हजार १०० रुपयाने तर लासलगाव बाजार समितीत सर्वाधिक ६ हजार ८०२ रुपयाने कांद्याची विक्री झाली.
------------
सर्वाधिक आवक पिंपळगाव(ब)
सोलापुरात सोमवारी सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक ११ हजार ६४२ क्विंटल इतकी झाली होती. उमराणा बाजार समितीत ८ हजार ५०० क्विंटल, लासलगाव बाजार समितीत ६५० ट्रॅक्टर कांदा विक्री झाला. सर्वाधिक आवक पिंपळगाव बसवंत बाजार समितीत १३ हजार ४५५ क्विंटल झाली.