आठवड्यात कांदा दरात प्रतिक्विंटल हजाराने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:19 AM2020-12-24T04:19:54+5:302020-12-24T04:19:54+5:30
यावर्षी खरीप कांदा लागवडीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे जिल्ह्यात विक्रमी कांदा उत्पादन करणाऱ्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा मोठा ...
यावर्षी खरीप कांदा लागवडीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे जिल्ह्यात विक्रमी कांदा उत्पादन करणाऱ्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला. सततचा पाऊस असल्याने जमिनीत अधिक ओलावा, वाफ्यांमध्ये पाणी साचून न होणारा निचरा, अधिक तापमानामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव कांदा पट्ट्यात वाढत गेल्याने पिकाचे नुकसान झाले. रोपांची मर होऊन लागवडी विरळ होण्यासह रोपे पीळदार होऊन आकुंचन पावत होती.
जमिनीतील अधिक ओलाव्यामुळे मुळांची कार्यक्षमता कमी होऊन रोपे बाधित झाली. अनेक शेतकऱ्यांनी कित्येक फवारण्या केल्या खतांचे डोस दिले; पण कांदा काही सुधारला नाही. याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कांदा काढत असताना तो मोठ्या प्रमाणावर नासलेला दिसून येत आहे.
एकीकडे रोगाने ५० टक्क्यांपेक्षा जास्त कांदा वाया गेलेला असताना इकडे सरकारने मोठ्या प्रमाणावर कांदा आयात केला आणि निर्यातबंदी केली. त्यामुळे चार हजारांवर असणारे कांद्याचे दर गडगडले. मागील आठवड्यात कांदा २५०० ते ४ हजार ५०० रुपये क्विंटल होता. मात्र आता हेच दर ७०० ते ३ हजार रुपयांवर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा निघेना झाला.
बार्शीतील लक्ष्मी-सोपान कृषी उत्पन्न बाजार समितीत या काळात दरवर्षी दररोज १० हजारांपेक्षा जास्त कट्टे आवक असायची, मात्र यावर्षी केवळ तीन ते चार हजार कट्टे आवक आहे. दर ही ३ हजाराच्या आत आहे.
कोट :::::::::::
बार्शी तालुक्यातील खामगाव, श्रीपतपिंपनी, सौंदरे, कांदलगाव, खडकलगाव, शेळगाव, राळेरास या गावांत मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झालेली आहे, मात्र यातील ४०० टक्केदेखील कांदा सुस्थितीत नाही. सरकारने तत्काळ कांदा आयात थांबवून निर्यात सुरू करावी.
- पिंटू करडे,
शेतकरी, कांदलगाव