वाहन परवाना काढण्यासाठी MBBS डॉक्टरांचे ऑनलाइन प्रमाणपत्र बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 12:14 PM2021-08-14T12:14:49+5:302021-08-14T12:14:55+5:30
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची माहिती
सोलापूर - चाळीस वर्षापुढील व्यक्तींना वाहन परवाना काढताना डॉक्टराचे फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे. आतापर्यंत आरटीओ कार्यालयाजवळ बसलेला एकच डॉक्टर दिवसातून असे पन्नास प्रमाणपत्र देत होता, पण यापुढे आता एमबीबीएस डॉक्टरचे ऑनलाईन सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आले आहे. एमबीबीएस डॉक्टरला आरटीओ कार्यालयतर्फे यूडीआय नंबर दिला जाईल व तो डॉक्टर दिवसातून फक्त वीस जणांना प्रमाणपत्र देऊ शकेल, अशी सोय करण्यात आली आहे, असे आयुक्त ढाकणे यांनी सांगितले.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आरटीओच्या सर्व सेवा ऑनलाइन करण्यात येत असल्याबाबत माहिती दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे उपस्थित होते. आरटीओच्या सर्व सेवा ऑनलाइन करण्यात येत आहे. वाहनांची नोंदणी ते दंडाची रक्कम ऑनलाईन भरता येणार आहे. वाहन घेताना तुम्ही दिलेला मोबाईल नंबर चालू आहे का नाही ते तपासा अन्यथा दंडाचा भुर्दंड तुम्हाला बसण्याची शक्यता असल्याचेही ढाकणे यांनी सांगितले.
वाहनाचा मोबाईल नंबर ऑनलाइन अपडेट करता येणार
वाहन खरेदी करताना दिलेल्या मोबाईल नंबरवर पुढील कारवाईचे संदेश दिले जातात. तुम्ही एखाद्यावेळी नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन थांबवले असेल किंवा सिग्नल तोडल्यानंतर वाहतूक पोलीस थेट नंबर प्लेटचा फोटो घेऊन ऑनलाइन कारवाई करतात. याबाबत तुमच्या नोंदणी मोबाईल क्रमांकावर संदेश दिला जातो. पण वाहन नोंदणीच्या वेळी जर डीलर्स किंवा एजंटचा नंबर दिलेला असेल तर हा संदेश तुम्हाला मिळत नाही किंवा कालांतराने तुम्ही सिमकार्ड बदलले असेल तर या कारवाईचा संदेश तुम्हाला मिळत नाही।. त्यामुळे कारवाईच्या वेळी आकारलेल्या दंडावर विलंबाचा शुल्क लागत जातो. यामुळे तुम्हाला दंडाचा मोठा भुर्दंड बसण्याची शक्यता असते. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने आता वाहन खरेदीवेळेला नोंदणी केलेला मोबाईल नंबर बंद असेल तर तुमचा चालू मोबाईल नंबर अपडेट करण्याची सोय केली आहे. घरबसल्या तुम्हाला तुमचा चालू मोबाईल नंबर अपडेट करता येईल. भविष्यात ही समस्या जाणवू नये यासाठी यापुढे वाहन नोंदणी करताना आधार कार्ड व पॅन कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.